देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दिल्ली, राजस्थान, मिझोरम, छत्तीसगड, मध्यप्रदेश या पाच राज्यामध्ये निवडणुका पार पडणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त बी. एस. संपत यांनी शुक्रवारी केली. पाच राज्यांतील एकूण ६३० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. आणि त्यासाठी १ लाख ३० मतदान केंद्रांवर ११ कोटी नागरिक मतदानाचा हक्क या वेळी बजावणार आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुकींची घोषणा होताच या राज्यात निवडणूक आचारसंहिता तातडीने लागू करण्यात आली असल्याची माहितीही मुख्य निवडणूक आयुक्त बी.एस. संपत यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, या निवडणुकांदरम्यान मतदारांना पहिल्यांदाच वोटिंग मशिनवरील सर्व उमेदवारांना मतदान नाकारण्याचा पर्याय सुद्धा मिळणार असून व्होटिंग म्हशीनवर ‘नन ऑफ दि अबाऊव्ह’ चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर तर दुस-या टप्प्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये २५ नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे.
राजस्थानमध्ये १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
दिल्ली व मिझोरममध्ये ४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
पाचही राज्यांत झालेल्या निवडणुकींचा निकाल ८ डिसेंबर रोजी लागणार आहे.
पाच राज्यात होणा-या निवडणुकीत पेड न्यूज आणि उमेदवार खर्च करीत असलेल्या पैशांवर निवडणूक आयोगाचा चौफेर वॉच असणार असून यामध्ये दोषी आढळलेल्या उमेदवारांवर कायदेशीरपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने ठरवले आहे.