मुंबई : रुपेरी पडद्यावर ‘बीपी’ या चित्रपटाद्वारे संवेदनशील विषयाने अवघ्या चित्रपटसृष्टीचे मन जिंकणार्या रोहितने आपल्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. एकपात्री सादरीकरणातून अभिनयाप्रती दिसणारी रोहितची निष्ठा कौतुकास पात्र आहे. मुक्त विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व जागतिक साक्षरता दिनानिमित्त विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्राने ‘एकपात्री अभिनय स्पर्धे’चे नुकतेच पी.डी. हिंदुजा महाविद्यालयात आयोजन केले होते. त्यात बालकलाकार म्हणून बीपी (बालक-पालक) या मराठी चित्रपटात अभिनय केलेल्या रोहित फाळकेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. चित्रपटात काम करूनही नाटकाविषयी असणारी रोहितची आवड या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आली. तर या स्पर्धेत सुमित तांबे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘तरुण पिढीने मराठी साहित्य वाचावे, त्याचा अभ्यास करावा व ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा; तेव्हाच मराठी भाषा आणि साहित्य चिरकाल टिकून राहील,’ असे प्रतिपादन विद्यापीठाचे मुंबई विभागीय संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले. त्यावेळी उपस्थित युवा विद्यार्थ्यांना संबोधताना ते बोलत होते. यावेळी विविध स्पर्धकांनी मराठी नाटकांतील स्वगते सादर केली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राचार्य जयवंत फाळके आणि प्राध्यापक प्रथमेश साळेकर हे उपस्थित होते.