‘शुद्ध देसी रोमान्स’वर तरुणाई फिदा
जंजीर अपयशी : अद्याप बजेटएवढीही कमाई नाही..
प्रकाश मेहरांच्या काही सुपरहिट चित्रपटांमधे गणना झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटाचा रीमेक मात्र प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही. हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. या चित्रपटाबरोबरच प्रदर्शित झालेल्या यशराज कंपनीच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाला ‘जंजीर’च्या तुलनेत जास्त प्रतिसाद मिळाला.आकडेवारीबाबतीत बोलायचे झाले तर ‘जंजीर’ची चार दिवसांची कमाई १२ कोटींच्या आसपास आहे. पण या चित्रपटाचे बजेट मात्र ६0 कोटी असल्याचे सांगितले जाते. यावरून चित्रपटाचे मोठे नुकसान होणे निश्चित आहे. दुसरीकडे ‘शुद्ध देसी रोमान्स’नी आघाडी घेऊन प्रदर्शनापासून चारच दिवसांत २६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. सोमवारी महाराष्ट्रात गणपतीची सुट्टी असल्याचा जास्त फायदा जसा ‘शुद्ध देसी रोमान्स’ला मिळाला तसा ‘जंजीर’ला झाला नाही. २0 कोटींपेक्षा कमी खर्चात बनलेल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ने आपले बजेट केव्हाच वसूल केले आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ च्या कमाईचा आकडा ५0 कोटींपेक्षा
जास्त कमाई करेल, असे सांगितले जात आहे.‘जंजीर’ची अवस्था इतकी वाईट आहे, की या चित्रपटाने २0 कोटींची कमाई केली आहे की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’ची कथा जयपूरमधील असली तरी दिल्ली, मुंबई आणि इतर महानगरांतल्या तरुण पिढीचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या चित्रपटात असलेली भरपूर चुंबन आणि प्रणयदृश्ये.
काही जुन्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर चित्रपट चालण्याबाबत खूप दावे करणार्या प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर रखडला. पहिल्या आठवड्यात ३८ कोटींची कमाई केलेल्या या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई फक्त ६0 कोटी इतकीच आहे. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’च्या यशाने तर ‘सत्याग्रह’ पूर्णपणे झाकोळला गेला आहे. चित्रपटाचे जाणकार ‘सत्याग्रह’कडे सरासरी यश मिळवणारा चित्रपट म्हणून पाहतात, जो फ्लॉपकडे जाण्यापासून वाचला आहे.
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार्या नव्या चित्रपटांमधे इंद्रकुमार यांच्या ‘मस्ती’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘ग्रँड मस्ती’, नसीर-रणदीप हुडा यांचा अँक्शन थ्रीलर चित्रपट जान डे आणि विक्रम भटचा हॉरर चित्रपट ‘हॉरर स्टोरी’ प्रदर्शित होणार आहे. तीनही चित्रपटांच्या कथा आणि विषय एकमेकांपासून पूर्ण वेगळे आहेत. या चित्रपटांमधे कोणताही मोठा कलाकार नसल्याने कोणत्याही चित्रपटाकडून जास्त अपेक्षा ठेवता येणार नाहीत.
– जंजीर – फ्लॉप
– शुद्ध देसी रोमान्स – हिट
– सत्याग्रह – सरासरी
– मद्रास कॅफे – हिट
– वन्स अपॉन टाइम इन मुंबई दुबारा – फ्लॉप