अनंत चतुर्दशी : गणरायाला निरोप देण्याकरिता पुणेकर सज्ज
पुणे : फुलांनी सजविलेल्या पालख्या, सामाजिक आणि पौराणिक विषयांवर केलेल्या रथांची तयारी पूर्ण करून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याकरिता गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. यंदा ढोला-ताशा पथकांसमोर आलेली विघ्ने आणि शहरात घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे पोलिसांवर आलेला अतिरिक्त ताण, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बाप्पाला निरोप देण्याकरिता प्रत्येक जण आनंदोत्सवात उत्साहाने सामील होणार आहे. दहा दिवसांच्या उत्सवात अथक परिश्रम केल्यानंतर देदीप्यमान विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याकरिता गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. या वर्षी शेवटचे पाचही दिवस रात्री १२ पर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्याने बाहेरगावाहून येणा-या नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण होते. सामाजिक विषयांची मांडणी करीत जिवंत देखाव्यांवर भर दिल्याने गणेशोत्सवात वेगळे वातावरण प्रत्येकालाच अनुभवायला मिळाले. आता विसर्जन मिरवणुकीतही दिमाखदार रथांची सजावट आणि ढोलांचा दणदणाट करण्याकरिता मंडळांनी कंबर कसली आहे. उद्या (दि. १८) सकाळी १0.३0 वाजता महापौर चंचला कोद्रे आणि पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे.
मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीला २८ तास ५0 मिनिटे लागली होती, तर २0११ मध्ये २७ तासांमध्ये मिरवणूक संपली होती. यंदाच्या वर्षी मिरवणुकीत ढोल-ताशा पथके आणि मंडळांवर काही बंधने घातली असली, तरी आम्ही स्वयंशिस्त पाळून विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्याचा प्रयत्न करू, अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.सूर्यास्तापूर्वी करावे गणपतीचे विसर्जन:
अनंत चतुर्दशीला (दि. १८) सायंकाळी ६. ४0 पूर्वी गणपतीचे विसर्जन करावे. गुरुवारी (दि. १९) दुपारी ४.४३ पर्यंत प्रोष्ठपदी पौर्णिमा राहणार असून, त्यानंतर पितृपक्ष सुरु होणार आहे. त्यामुळे ज्यांना अनंत चतुर्दशीला विसर्जन करायचे असेल त्यांनी सूर्यास्तापूर्वी करावे, असे शारदा ज्ञानपीठम्चे पंडित वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.