रुग्णांना गर्दीत न जाण्याचे महानगर पालिकेचे आवाहन
राज्यात स्वाइन फ्ल्यूची साथ हळूहळू पसरत असून ज्वराची लक्षणे असलेल्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. ताप, घसादुखी, घशात खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी या त्रासाने अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. ज्वराच्या या लक्षणांमुळे त्रस्त असलेले अनेक रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जात आहेत. रुग्णांनी ताप, सर्दी, खोकला अंगावर काढू नये. वेळीच डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करावेत. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवात उसळणाऱ्या भाविकांच्या गर्दीत फ्ल्यूने त्रस्त असलेल्या रुग्णांनी जाऊ नये. त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढण्याची भीती आहे.
या पासून वाचण्यासाठी आपण हे उपाय करू शकता
* साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.
* पौष्टीक आहार घ्यावा.
* लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करा.
* धुम्रपान टाळा.
* भरपूर पाणी प्या.
* शंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरा
हे टाळा..
* हस्तांदोलन
* सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.
* फ्ल्यूसदृश लक्षणे वाटल्यास गर्दीत जाऊ नये.