Pasaydan and its Meaning
सुप्रसिद्ध सांप्रदायातील श्री सार्थ ज्ञांनेश्वरीतील अठरावा अध्यायातील पसायदान व अर्थ !
आता विश्र्वात्मकें देवें । येणें वागयज्ञे तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
जे खळांची व्यंकटी सांडो । सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो मैत्र जीवांचें ।।
दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।
चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं । भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें । दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।
तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।अर्थ –! आता, सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर त्यानें या माझ्या वागयज्ञरूप सेवेनें प्रसंन्न होऊन मजवर हा प्रसाद करावा. खलजनांच्या दुष्ट बुद्धीला पालट पडून त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी. व सर्व भुतांच्या ठिकाणी परस्परां बद्दल मित्रभाव नांदावा. पातकरूप अंधकाराचा नाश होऊन जगात धर्मरूप सुर्याचा उदय असो; व प्राणी मात्रांच्या सदिच्छा फलद्रूप होवोत. ईश्वरनिष्ठांचा समुदाय भूतलावर सकल मंगलांचा अखंड वर्षाव करीत असलेला सर्व भूतांना भेटो. ती संतमंडळी म्हणजे चालते कल्पतरुंचे बाग चेतन चिंतामणीचे गांव व अमृताचे बोलते होत. निष्कलंक चंद्र, अतापदायी सूर्य, असे जे सज्जन ते सर्व लोकांच्या प्रेमाचे स्थान असो. किंबहुना, त्रैलोक्य सुखी होऊन त्यांनी विश्व पालक जो आदी पुरुष त्याचे अखंड भजन करावें. आणि विशेषत: येथें हाच ग्रंथ ज्यांनी आपले उपजीव्य मानिले आहे. (सर्वाधार, तारक) त्यांना दृष्ट व अदृष्ट विजय सुखांचा लाभ घडत जावा. तेव्हा , सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसंन्न होऊन म्हणाले. ” तथास्तु ”; तुझी हि ईच्छा सफल होईल; असा तुला प्रसाद आहे; त्यायोगे ज्ञांनेश्वर महाराज सुखी झाले.
Source : Marathi Unlimited.