वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्ये विघ्न जाले ऎका ।।
आकाशीची वाणी सांगतसे कंसा । मानी भरवसा हा बोलण्याचा ।।
आठवा ईचा पुत्र वधील तुजशी । ऐकोन मानसी क्रोधावला ।।
घेउनिया खड्ग माराया धावला । हात तो धरिला वसुदेवें ।।
देईन मी पुत्र सत्य माझे मानी । ठेवा बंदीखाणी दुतां सांगे ।।
होतान्सी प्रसूत नेउनिया देत । साहाही मारीत दुराचारी ।।
धन्य त्यांचे ज्ञान न मरीच शोक । वधितां बालक नामा म्हणे ।।।।