परसा यांच्या पत्नि कमळजा ने केलेला परसा भागवतां सोबत संवाद!{ अभंगा द्वारे}
यावर काय बोलली पतिव्रता । विनंती करिते कोपुं नका ।
तुम्हासी गर्व जरी नसता । तरी घरी भेटता परमात्मा ।।
तुम्ही ब्राम्हण पवित्र धन्य । मुखी वेद हरीचें नाम ।
वरी गर्व अवलक्षण । सकळहि धर्म लोपले ।।
अमृत घातले पाषाणावरी । वरी वरी ओला कोरडा भितरीं ।
तैसा घात तुमच्या शरिऱी । गर्वे हरी न भेटेची ।।
गाय ते सर्वां ठायीं पवित्र । परी तिची वासना अपवित्र ।
तैसें तुमचे धन्य कुळगोत्र ।गर्व अपवित्र सांडा जी ।।
तुम्हांसी चाड जरी हरिसी । तरी मत्सरू करुं नका नामदेवासी ।
तो आलिया घरासी । हरी तुम्हांसी भेटेल ।।
आतां आदर करून आणाल नामा । तयासवे येईल परमात्मा।
भेट होईल तुम्हां आम्हां । त्या नामयाचेनि प्रसादें ।।
आणखी एक अवधारी । राउळा येत होते हरि ।
नामा होता बरोबरी । अंचळ सरसावी रखुमाई ।।
आणि एक वृतांत ऐकला । कीर्तनासी नामदेव आला ।
द्वारकेचा भोपा पोळला । तो बुजविला येउनि ।।
आणिक महादेवद्वाऱी कीर्तन मांडिले । हे आंवढ्यासी वर्तलें ।
देऊळ त्याकडे फिरलें । भले नवल नामयाचे ।।
एसें बोलली कमळजा । तुम्ही स्वामी मी भाजा ।
सर्व सांडा जी वोजा । तरी पंढरीराज भेटेल ।।१०।।
Source : Marathi Unlimited