परसा भागवतव नामदेव यां मधील संवाद ,,,
भूवैकुंठ जागा क्षेत्र हे पंढरी । नांदे तेथें हरि द्वारकेचा ।
तची गावी असे परसा भागवत ।करीतसे भक्ती रुक्मिणीची ।।
आदिमाया जाहली ती प्रसंन्न ।दिला त्या कारणे परीस ऎक ।
लोहासी लाउनि सुवर्ण तो करी । सुखे हा संसारीं राहतसे ।।
नित्य महाद्वारीं वाची रामायण । करिती श्रवण साधुसंत ।
भजन करुनी नामा येतं तेथें । पुस्रसे अर्थ त्याजलागी ।।
सांगा कैसे आहे लंकेची रचना । कोण कोणत्या स्थाना राहताती ।।
बाबा तेचि सांगा मजलागी खूण । बोलत प्रमाण नामा त्यासी ।।
शास्त्र पाहोनिया करितो उत्तर । आणिक विचार पुसे त्यांसी ।
दोघांचा संवाद होतां महाद्वारी ।विस्मय अंतरी करिती संत ।।
परसोबा सांगत रुक्मिणी लागून । करितो अपमान नामा माझा ।
ऐक मातें माझी विज्ञापना । दावी तू रचना लंकेची हे ।
पाहोन मी लंका येईन मी मायें । समाधान होय नामयाचें ।।
सांगेन तयांसी सकळ वृतांत । पूर्वी हा हेत आतां माझा ।।
लेंकुरा चे कोण पूर्वल लळे । घेतली म्यां आळ तुजपाशीं ।।
करी मातें माझे आतां सामाधान ।वंदित चरणा परसा तेंव्हां ।।
अवश्य म्हणोनियां दिलें तें वचन ।आनंदला पूर्ण भागवत ।।
बैसविले तिनें त्यासी हातावरी । दाविली नगरी बिभीषनाची ।
पाहें बापां आतां होऊनिया स्वस्थ । पूर्वी हा हेत आपुला तुं ।।
पाहोनिया लंका आनंदला मनी । धन्य हे करणी कर्त्याची ।।
रम्य स्थळ जागा अपूर्व ते फार । होतसे गजर नामघोष ।
घरोघरी होय वेदपारायण । रामनामी मन सर्वत्रांचे ।।
सर्व पाहोनिया लंकेची रचना ।आला तो सदना बिभीषनाच्या ।।
पाहातो तो नामा उभा कीर्तनास ।गुण गात असे देवाजीचे ।।
शरण जे गेले माझ्या पंढरिनाथा ।नाही भय चिंता त्यास काही ।।
विस्मय तो करी परसोबा अंतरी । फिरला माघारी तेथुनिया ।
बैसविलां करी तेव्हा रुकमिणीनें करीं ।आणिला पंढरी क्षेत्ररा माजी ।।
समजले तेव्हा नामया लागुनी । पुसतसे खून तुजलागीं ।
परसोबा सांगत त्यासी सविस्तर। बिभीषण मन्दिर कैसे असे ।।
ऐकोनियां ऐसें न करी उत्तर। कां रे अहंकार धरिलासी ।
हाती तुझ्या आला होता चिंतामणी । कैसा तु गोफणी लाविलासी ।।
कल्प वृक्ष तुझ्या अंगणी लाविला । कैसा उपडिला अभागियां ।
अमृताचा घट हातासी लाधला ।कैसा उलंडीला वेडिया तुं ।।
तैसा माहाराज तोचि बिभीषण । कां नाही नमन केंले त्यासी ।।।
सदोदित ज्याचे हृद्य रामचंद्र । दुजा कां विचार धरिला तेथें ।।
अहंकारे मोठे मोठे नाड्लेती । सांगसी त्या तुं युक्ती शास्त्राच्या तें ।
तोचि अहंकार धरिलासी अजून । होई आता लीन संतापायीं ।।
तेणें हा झडेल अंतरीचा मळ । दिसेल सकळ ब्रम्हरूप ।
समजला तेव्हां परसोबा मनी । न कळें करणी नामा तूझी ।।
गळोनिया गेला त्याचा अभिमान । जाला तेंव्हा लीन संतापायीं ।
संतांची करणी असे अघटित । करी दंडवत नामदेव ।।४१।।
…………………………………………………………………………………….
परसा भागवताने केली नामदेमवांची स्तुती!
परसा म्हणे नाम्या मी तुज देखिलें । प्रत्यक्ष विठ्ठलें ऐसें जाण ।।
तूंच तुं विठ्ठल तूंच तुं विठ्ठल । हाचि सत्य बोल जान आम्हां ।।
तुवां पदे केली राउळे सांगितली । येरी कवित्वें केलीं आपल्या मतें ।।
तू शिंपी नामा आम्ही उत्तम याति ।वायां अहंवर्ती पडलों देखा ।।
आम्ही एक आपुले दृष्टीनें देखिलें देव भक्त जालें दोन्ही एकरूप ।।
तुझें नाम जपतां महापातकें जाती । तेणें होय मुक्ति म्हणे परसा ।।६।।
……………………………………………………………………………………………….
नामदेवांनचे परसोबास समजावणे
तुम्ही गावें तेंचि आम्ही अंतरी घ्यावे । म्हणोनि स्वभावें भावा भाव नाहिं येथें ।।
आम्ही तुम्हीं कांही नाहीं बा वेगळे । ऐसा खेळे मेळे दिवस चारी ।।
जाणें तें न चुके अपकीर्ती कायसी । नामा परसोबासी विनवितसे ।।३।।
Source : Marathi Unlimited.