राज्यात सर्वत्र अति वृष्टी होत आहे. जिकडे तिकडे पाऊसच पाऊस पडत आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट कोरडाठाक गेला आणि सप्टेंबर सुरू होताच पावसाला जाग आली. सप्टेंबर उजाडताच पाऊस कोसळला तो तीन महिन्यांतला बॅकलॉग भरुन काढायचा असा निश्चय करुनच… मुंबईकरांची आठवड्याची सुरुवातच झाली ती ढगांच्या गडगडाटानं आणि विजांच्या कडकडाटानं… दिवस उजाडला तोच पावसाच्या रिपरिपीनं. सकाळीच मुंबईतल्या सखल भागांत पाणी साचायला सुरुवात झाली. सायन, कुर्ला, हिंदमाता, अंधेरी, मालाड सबवे, गोरेगाव, साकीनाका, मिलन सबवे परिसरात पाणी साचलं. ठाण्याच्या राम मारूती रोड, वंदना टॉकीज, नौपाडा, वसंत विहार, कोपरी परिसरात पाणी साचलं. पावसाच्या तडाख्यामुळे तिन्ही मार्गांवरच्या रेल्वेंचा वेगही मंदावला. दुपारपर्यंत पावसाची उघडझाप सुरू होती. पण संध्याकाळी पावसानं पुन्हा दमदार कमबॅक केलं. पावसानं मुंबईकरांना सोमवारी चांगलच झोडपलं. मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच झाली ती पावसाच्या सरींबरोबर. दिवसभर पावसानं मुंबईकरांना असा काही इंगा दाखवला की आधी ‘येरे येरे पावसा’ म्हणायला लावणा-या पावसानं आज मात्र ‘पावसा जरा दमानं’ असंच म्हणायला लावलं.
Source : Marathi News.