बस नदीत कोसळून १९ ठार
विघ्नहर्त्याच्या उत्सवादरम्यान एका मोठय़ा विघ्नाने या परिसरात अनेकांच्या घरात अश्रूंचे पाट वाहू लागले. शेगाव येथून पातुर्डा या गावाकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस खिरोडा गावाजवळील पुलावरून पूर्णा नदीच्या पात्रात कोसळल्याने १९ प्रवाशी जागीच ठार तर १७ गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी ११.१0 च्या दरम्यान घडली.
शेगाव आगाराची (एमएच – १२ – ईएफ – ६८६७) बस येथून पातुर्डा येथे जाण्यासाठी निघाली. चालक वाहकांसह ३७ प्रवासी होते. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळच्या पूर्णा नदी पुलावर अध्र्यावर आली असताना अचानक मोठा आवाज होवून बस नदीपात्रात कोसळली. या पुलाला कठडे नाहीत. मोठा आवाज झाल्याने नदीच्या काठावरील गाळकर कुटुंबांतील सदस्यांचे लक्ष गेले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती फोनवरून खिरोडा ग्रामस्थांना दिली. त्यानंतर शेगाव व तामगाव पोलिसांनी मदतकार्य सुरु केले. नदीपात्रात पाणी असल्याने मदतकार्यामध्ये अडचणी आल्या. बसचे टप गॅसकटरने कापूून काढावे लागले त्यानंतरच प्रवाशांना बाहेर काढता आले. काहीजण वाहून गेले. दिवसभर आजुबाजूच्या गावातील नागरिक जिवाच्या आकांताने मदत कार्य करत होते. ज्यांना पोहता येत होते, त्यांनी बसच्या खिडकीतून काहींना बाहेर काढण्यासाठी धडपड केली. १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
Source : Online Marathi News