सर्मथकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींवर केलेल्या हल्ल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माफी मागितली. तसेच, पुन्हा हिंसाचार केला तर उपोषण थांबवेन, असा इशाराही त्यांनी सर्मथकांना दिला. टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनीही त्या घटनेबद्दल खेद व्यक्त करतानाच माध्यमांवरही ठपका ठेवला.
जंतरमंतरवर रविवारपासून अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. ते आणि त्यांचे सहकारी व्यासपीठावर येण्यापूर्वी काही कार्यकर्त्यांनी काल रात्री प्रसिद्धिमाध्यमांविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यावरून माध्यमांचे प्रतिनिधी आणि सर्मथकांमध्ये शाब्दिक चकमक झडली. जंतरमंतरवरील आंदोलनाला योग्य तो न्याय दिला जात नाही, हे टीम अण्णाचे सदस्य शांती भूषण यांचे वक्तव्य आगीत तेल ओतणारे ठरले.
Source : Marathi News.