आसाम आणि म्यानमारमधील दंगलींचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर जमलेला जमावच आज दंगलखोर बनला. जाळपोळ, तोडफोड करीत या जमावाने थेट सीएसटीवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. लाठीमार, हवेत गोळीबार करूनही हा जमाव नियंत्रणात आला नाही. उलट जमावाच्या हिंसाचारात दोघांचा बळी गेला तर ४५ पोलिसांसह ५५ जण जखमी झाले. रझा अकादमीच्या नेतृत्वाखाली ५0 हजार आंदोलक आझाद मैदानात जमले होते. आसाम दंगल जगासमोर योग्य पद्धतीने येत नसल्याचे सांगत दुपारी अडीचच्या सुमारास आंदोलकांनी भाषणांतून मीडियावर हल्ला चढविला. हे ऐकून आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी कव्हरेज करणार्या प्रसारमाध्यमांना रोखण्याचा प्रयत्न केला. हा जमाव पुढे हिंसक होत मीडियाच्या गाड्यांवरच तुटून पडला. कर्मचार्यांना बाहेर काढून वाहनांना आग लावत हा जमाव सीएसटीकडे निघाला.
रझा अकादमीचे हात वर…
आंदोलकांतील काही जण अचानक आक्रमक झाले. निषेधासाठी आम्ही जमलो होतो. आमचा या हिंसेला पाठिंबा नसल्याचे सांगत आंदोलन पुकारणारे रझा अकादमीचे मुख्य सचिव मोहंमद सईद यांनी हिंसाचाराबाबत हात वर केले.
मुंबई, ठाण्यात अँलर्ट…
मुंबईसह ठाण्यातही अँलर्ट जारी करण्यात आला. ठाण्यात मोहल्ला कमिटीच्या बैठकाही घेण्यात आल्या. राबोडी, मुंब्रा, हाजुरीसह कल्याणमधील बैलबाजार, वल्लीपीर, पारनाका, दूधनाका, नेतिवली, पत्रीपूल, रामबाग या भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Source : Marathi TV