२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू जिंदाल नेपाळमध्ये दहशतवादाचा पहिला पाठ शिकला होता. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद असलम ऊर्फ असलम कश्मिरी याने नेपाळात वर्ष २00४ मध्ये त्याच्या शस्त्रास्त्र प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. अबू जिंदाल ऊर्फ अबू हमजा ऊर्फ सय्यद जबीउद्दीन याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली होती. तो दहशतवादी संघटनेसाठी काम करीत असल्याचा विश्वास बसल्यानंतर, महाराष्ट्रातील बीड निवासी जिंदाल चार जणांना सोबत घेऊन नेपाळकडे रवाना झाला. येथे त्यांना कश्मिरीने शस्त्र चालविणे आणि आयईडी स्फोटके बनविण्याचे प्रशिक्षण दिले. दहशतवादी जाळे पसरण्याचा त्याचा यामागील हेतू होता. १९ फेब्रुवारी २00६ रोजी अहमदाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटाच्या तपासादरम्यान जिंदाल दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. गुप्तचर संस्थांनी वेळीच कारवाई करून नाशिक-औरंगाबाद महामार्गावर ४३ किलो आरडीएक्स, १६ एके रायफली, ३२00 गोळ्या आणि ५0 हातबॉम्ब जप्त केले होते. यावेळी जिंदाल आणि असलम कश्मिरीने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला होता, अशी माहिती त्याने दिली.
Source : Marathi news.