गेल्या काही महिन्यांपासून राजेश खन्ना यकृताच्या विकारानं आजारी होते. हे दुखणं इतकं बळावलं की, त्यांनी अन्नपाणीही सोडलं होतं. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यात त्यांना चार वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. दोनच दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा त्यांची प्रकृती सुधारल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं. परंतु, औषधोपचाराला कुठलाही प्रतिसाद न देणा-या राजेश खन्नांची प्रकृती ढासळत गेली. आज सकाळी तर त्यांची तब्येत अगदीच खालावली होती. तशातही, डॉक्टरांनी दुपारपर्यंत प्रयत्नांची शर्थ केली, पण अखेर दीडच्या सुमारास ‘काका’नं अखेरचा श्वास घेतला आणि सिनेसृष्टीचा ‘आनंद’ हरपला. दुपारी साडेचार वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते ६९ वर्षांचे होते. मृत्यूसमयी पत्नी डिंपल, मुलगी ट्विंकल आणि जावई अक्षय खन्ना त्यांच्यासोबत होते. ‘आनंद’ या अजरामर चित्रपटातून जीवन जगायला शिकवणारे आणि क्षणभंगूर जीवनाचं हे वास्तवही सांगणारे बॉलिवूडचे पहिले ‘सुपरस्टार’, हिंदी सिनेसृष्टीचे ‘काका’ राजेश खन्ना यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं.
Source : Online News Updates.