सतत तीसरयाही दिवशी पाऊस आलेल्या मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाणीच पाणी झालेलं आहे. बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरींनी मुंबईकरांना चिंब करून टाकले. या मोसमातील पावसाने आता मुंबईत मुक्काम कायम केल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही भागात २० ते ३० मि. मी. पावसानेही पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत.
मंगळवारी रात्रीपासूनच शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. मुंबईकरांची बुधवारची सकाळ उजाडली ती पावसाच्या स्वागताने. सकाळी ऑफिसला जाण्याच्या वेळेतच पावसाचे सरीवर सरी सुरू असल्याने नोकरदारांची रेल्वे स्टेशन गाठताना चांगलीच तारांबळ उडत होती. पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलही पाच-दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारी लोकलसेवा रूळावर आली. मात्र पावसाचा जोर वाढल्यास गाड्या उशिरा धावण्याच्या भीतीने स्टेशनमध्ये प्रवाशांना पावसाची आवश्यक माहिती दिली जात होती.