पंढरीत ९ लाखांहून अधिक भाविकांच्या साक्षीने आषाढी एकादशी सोहळा पार पडला. अवघी पंढरी भक्तिसागरात चिंब झाली होती. भाग गेला शीण गेला। अवघा झाला आनंद।। या अभंगाप्रमाणे वारकर्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सत्वशीला यांनी समस्त वारकर्यांच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजा करण्याचा मान हकनकवाडी (ता. उदगीर, जि. लातूर) येथील मुरलीधर धोंडिबा फड व त्यांची पत्नी दीपाली या वारकरी दाम्पत्याला मिळाला. विठ्ठलाला लाल रंगाचा मखमली अंगरखा आणि पांढरे करवतीकाठी धोतर घालण्यात आले होते. विठ्ठलाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोळखांबीमध्ये संकल्प सोडला. रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. रुक्मिणी मातेला जरीची साडी घालण्यात आली. मूखदर्शन रांगेतून दर्शनाची गती वाढली असून, प्रतिसेकंद चाळीस ते पंचेचाळीस वारकर्यांचे दर्शन होत आहे. या हिशोबाप्रमाणे दिवसभर साठ हजार भाविकांना दर्शन मिळत आहे. नवमी ते द्वादशी या चार दिवसांत तीन लाखांपर्यंत भाविकांना दर्शन मिळण्याचा अंदाज आहे.
Source : Marathi News.
jai jai pandurang hari… jay jay pandu rang hari……..0 Stars