शरीराला हृदयाकडून रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून रक्तपुरवठा होतो. या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळ्यांमुळे रक्तपुरवठ्याला आडकाठी झाली की ह्रदयविकाराचा झटका येतो. त्याचप्रमाणे , मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा आल्याने किंवा अंतर्गत रक्तस्त्रावाने पक्षाघाताचा विकार उद्भवण्याची शक्यता असतो. पक्षाघाताचे कारण मेंदूतील छोट्या नसांमधला अडथळा असल्याचे आढळून आले आहे. या वेगळ्या प्रकारासाठी जनुके कितपत जबाबदार आहेत , याविषयी सखोल संशोधनाची आवश्यकता असल्याचे मत डॉक्टर व्यक्त करतात. पक्षाघाताला बळी पडण्याचे प्रमाण पुरूषांपेक्षा महिलांचे जास्त असल्याचेही आढळले असून धकाधकीचे आयुष्य , व्यायामाचा अभाव , डायबिटीस या नेहमीच्या कारणांबरोबरच गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन हे कारणही पुढे आले आहे. अशा वेगळ्या पध्दतीच्या कारणांमुळे उपचारात सहजता येत असल्याचेही डॉक्टरांचे निष्कर्ष आहे. धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेजेस काढणे अवघड असतानाच छोट्या नसांमधला रक्तप्रवाह सुरळीत करण्याच्या प्रक्रिया सोप्या असल्याचे डॉक्टर सांगतात. पक्षाघात झाल्यामुळे घराघरांमध्ये पडून असलेले पेशंट्स आणि वर्षानुवर्षे काळजी घेणारे कुटुंबिय हे चित्र आपल्याला सहज दिसून येते. मुळात पक्षाघाताविषयी जागृतीचा असलेला अभाव हे पक्षाघाताचे मूळ कारण आहे.
Source : Marathi Unlimited.