१४ व्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी गुरुवारी मतदान होणार असून, त्यासाठी दिल्लीत संसद भवनात आणि राज्य विधानसभा परिसरांमध्ये व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. संपुआचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि भाजपा सर्मथित पी. ए. संगमा यांच्यात सरळ लढत आहे. लोकसभा व राज्यसभेच्या सुमारे ७७ खासदारांनी दिल्लीऐवजी राज्यांमध्ये मतदान करू देण्याची केलेली विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यानुसार राज्यसभा सदस्य अनिल देसाई, डॉ. वाय. पी. त्रिवेदी व संजय राऊत तसेच लोकसभा सदस्य एस. प्रताप नारायणराव, हरिश्चंद्र देवराव चव्हाण, आनंद परांजपे, संजीव नाईक, गजानंद बाबर आणि शिवाजीराव अढळराव पाटील असे एकूण नऊ खासदार मुंबईत मतदान करतील. संसद भवनात दालन क्र. ६३ मध्ये सकाळी १0 ते सायं. ५ या वेळात मतदान होईल.
Source: Marathi News