योग हा माणसाला घेरणारा पाप पिंजरा दग्ध करून टाकतो, योगाचे दोन प्रकार आहे. एक ”अभाव” व दुसरा ” महायोग ” जेव्हा आपण शून्य आहोत आणि सर्व प्रकारच्या गुणांनी रहित आहोत, असे चिंतन केले जाते तेव्हा त्याला ”अभाव” योग म्हणतात, आपला आत्मा आनंद पूर्ण, सर्व पाप रहित आणि परमेश्वराशी अभिन्न आहे, अश्या चिंतनाला ”महायोग” म्हणतात, योगाने ज्ञान लाभते, ते ज्ञान योग्याला मुक्ती लाभास सहाय्यभूत ठरते. ज्याच्या ठायी योग आणि ज्ञान दोन्ही वसतात, त्याच्या वर भगवान प्रसंन्न असतात. जे दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा, सर्वदा महायोग करतात त्यांना देवताच समजा!. या दोन्ही प्रकारच्या योगांच्या सहाय्याने योगी आत्मसाक्षात्कारकरून धेतो, समस्त योगां मध्ये हा योग सर्व श्रेष्ठ आहे.
प्राणायामाची तीन अंगे आहेत, पूरक कुंभक व रेचक, रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे, पूरक म्हणजे श्वास आत घेणे, कुंभक म्हणजे श्वास आत धारण करणे व धरून ठेवणे. ज्या प्राणायामात बारा सेकंद पूरक केला जातो, म्हणजेच वायू आत घेतला जातो तो ”कनिष्ट” प्राणायाम होय, चोवीस सेकंद पूरक केल्यास तो ”मध्यम” प्राणायाम होय आणि ज्यात बत्तीस सेकंदाचा पूरक असतो त्याला ”उत्तम” प्राणायाम म्हणतात. कनिष्ट प्राणायामात घाम येतो, मध्यम प्राणायामात शरीराला कंप सुटतो. आणि उत्तम प्राणायामात आसनावरून उत्थान होऊन अतिशय आनंद वाटू लागतो. वेदामध्ये गायत्री नावाचा अतिशुद्ध व पवित्र असा मंत्र आहे, त्याचा भावार्थ असा आहे ” या विश्वाला जन्म देणाऱ्या त्या ज्योतिर्मय परम पुरुष्याच्या महिम्याचे आम्ही ध्यान करतो तो आमच्या बुद्धीत, ज्ञानात, विकास करो! या मंत्राच्या प्रारंभी आणि शेवटी “ओम” जोडलेला असतो, एका प्राणायामात गायत्री मंत्र तीनदा मनातल्या मनात उच्चारावा .