‘ राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच ‘ , असा ठाम निर्धार करून कामाला लागलेले लोकसभेचे माजी सभापती पी ए संगमा यांनी आज, आपल्या मार्गात आड येणा-या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आता ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित झालंय आणि या मोहिमेसाठी त्यांना रालोआचीही साथ मिळण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून वारंवार अपमानित झाल्यानं पक्षाचे संस्थापक सदस्य असलेल्या पूर्णो संगमा यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली. त्यांनी संगमांचा राजीनामा मीडियासमोर वाचूनच दाखवला. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू नये, यासाठी संगमा यांच्यावर राष्ट्रवादीकडून दबाव आणला जात होता. निवडणूक लढवल्यास पक्षातून काढून टाकण्याचा आणि अगाथा संगमा यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा इशारा राष्ट्रवादीनं दिला होता. ज्या पक्षाचे आपण संस्थापक सदस्य आहोत, त्या पक्षाकडूनच अशी वागणूक मिळाल्यानं व्यथित झाल्याचं संगमांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय.
पी ए संगमा यांनी राष्ट्रवादीला राम-राम ठोकल्यानं भाजपला हक्काचा उमेदवार मिळाल्याचं बोललं जातंय. तसंही, यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याची घोषणा भाजपश्रेष्ठींनी कधीच करून टाकली होती. पण शेवटपर्यंत त्यांना उमेदवारच सापडला नाही. तोवर, यूपीएनं प्रणव मुखर्जी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे प्रणवदांना ‘ टफ फाइट ‘ देऊ शकणारा उमेदवार भाजपला हवाच होता. संगमा यांना अण्णा द्रमुक आणि बिजू जनता दलानं पाठिंबा जाहीर केलाय. आता त्यांच्या पाठीशी भाजपही उभं राहू शकतं. अर्थात, रालोआमधील घटकपक्षांशीही ते यासंबंधी चर्चा करणार आहेत. त्यांच्यापैकी किती जण संगमांना साथ देतात, यावर बरीच गणितं अवलंबून आहेत. भाजपनं संगमांना पाठिंबा दिल्यास शिवसेना काय करणार, याकडे राज्यातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.