‘क्ले कोर्ट किंग’ अर्थात लाल मातीचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणार्या स्पेनच्या राफेल नदालने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी सातव्या विजेतेपदाला गवसणी घातली. दुसर्या मानांकित नदालने अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा ६-४, ६-३, २-६, ७-५ ने पराभव करीत रोला गॅरोजवरील वर्चस्व कायम राखले. या पराभवामुळे जोकोविचचे सलग चार ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटाकवण्याचे स्वप्न भंगले. नदालचे हे ११वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. नदालने आज जोकोविचचा पराभव करीत सलग तीन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड केली.