लालकृष्ण अडवाणी यांची खा. विजय दर्डा यांच्याशी मनमोकळी चर्चा
लोकशाहीत राजकीय पक्ष महत्त्वाचे तर असतातच, पण नेते त्याहूनही महत्त्वाचे असतात. सर्वसामान्य लोक पक्षापेक्षा नेत्यांवर अधिक विश्वास ठेवतात आणि त्या आधारावरच राजकीय निर्णय घेतात, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केले आहे.
अडवाणींना आपल्यांनीच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर केले आहे. चर्चेच्या वेळी देशातील राजकीय स्थितीवर बोलताना अडवाणी खिन्न आणि उदास वाटत होते. देशातील राजकीय वातावरण चांगले नाही, सत्तारूढ संपुआचे नेतृत्व करीत असलेली काँग्रेस कमकुवत स्थितीत आहे, असे ते म्हणाले. त्यावर भाजपा मजबूत स्थितीत आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आला असता गृहमंत्री आणि उपपंतप्रधान राहिलेले अडवाणी यांनी भाजपाची स्थितीही खूप चांगली नसल्याचे कबूल केले. सर्वसामान्य जनता भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसवर संतप्त आहे. त्याचवेळी आमच्या चुकीमुळे भाजपावर नाराज आहे, असे त्यामुळेच मी माझ्या ब्लॉगवर लिहिले होते. भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कामकाजाबद्दल ते म्हणाले की, गडकरी ठीकपणे काम करीत आहेत. संपुआ सरकारची निर्णयक्षमता अधू झाली आहे. या सरकारमध्ये पंतप्रधान नंबर वन राहिले नाहीत. खरेच असे आहे काय, यावर त्यांनी पंतप्रधानांना निर्णय घेताना अन्य कुणावर निर्भर राहावे लागत असल्याचे स्पष्ट केले.
राज्यसभा खासदार आणि लोकमत मीडिया लि.चे अध्यक्ष विजय दर्डा यांनी आज अडवाणी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांच्यात अनेक मुद्दय़ांवर दिलखुलास चर्चा झाली. पक्ष मोठा की नेता, याबद्दल तपशिलात बोलताना अडवाणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, की जे काम अनेक दशकांपासून सक्रिय काँग्रेसला करता आले नाही, ते साधेपणा आणि शूचितेचे प्रतीक बनलेल्या लढवय्या ममतांनी करवून दाखविले. केवळ ममताच काय? उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आणि विदेशांमध्येही नेतेच जनआकर्षणाचे केंद्र राहिले आहे. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर सत्तारूढ झाल्यानंतर तेथे थॅचॅरिझम चालले, असे अडवाणी म्हणाले.
Source : Marathi Online Team.