पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज सैयद युसूफ रझा गिलानी यांना पाकिस्तानच्या संसदेचे सदस्य व पर्यायाने पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र घोषित केल्याने वाढता दहशतवाद व नाजूक आर्थिक स्थितीशी झुंजणारा पाकिस्तान आज पुन्हा एकदा घोर अनिश्चितेत लोटला गेला. ते संसदेचे सदस्य राहण्यास अपात्र ठरले आहेत व पाकिस्तानचे पंतप्रधानपदही रिक्त झाले आहे, असे जाहीर करीत नवा पंतप्रधान नेमण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेतृत्वाखालील सध्याचे सरकार हे सर्वात दीर्घायुषी सरकार आहे. येत्या १३ फेब्रुवारीला ते पाच वर्षांचा नीयत कार्यकाळ पूर्ण करील. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. सरकारला आता पंतप्रधान बदलण्याखेरीज अन्य मार्ग नाही, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. गिलानींची जागा कोण घेणार हे स्पष्ट नाही. सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची पुढील रणनीती ठरिवण्यासाठी रात्री बैठक व्हायची होती.