भाजपमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले असून गुजरात भाजपमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी समर्थक आणि भाजपनेते संजय जोशी यांच्या समर्थकांचे दोन गट आता समोरासमोर ठाकले आहेत. या वादंगाचा एक भाग म्हणून अहमदाबादमध्ये संजय जोशी यांचे कौतुक करतानाच, नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडणारे फलक लावण्यात आले आहेत. गुजरातमध्ये येत्या डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होत असून त्यांच्या तोंडावरच माजलेली ही दुफळी सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे.
छोटे मन से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई बडा नही होता. कहो दिल से… संजय जोशी फिर से… अशी वाक्ये या फलकांवर झळकत आहेत. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल या फलकांवर चकार शब्द काढलेला नसला तरी त्यातून त्यांनाच कोत्या मनाचे ठरवत टोमणे हाणले आहेत.