26/11 हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अबू जुंदल याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचं एक पथक दिल्लीत दाखल झालंय. अबू जुंदलची कोठडी मिळावी यासाठी क्राईम ब्रँचनं तीस हजारी कोर्टात अर्ज केलाय. दिल्ली पोलिसांनी याबाबत आपली प्रतिक्रिया उद्यापर्यंत देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. त्यामुळे जुंदल मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात मिळणार का याचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान ,अबू जुंदालनं चौकशी दरम्यान हाफीज सईदसोबत काम केल्याची कबुली दिली आहे. तसेच मुंबई हल्ल्यादरम्यान नरीमन हाऊस इथल्या अतिरेक्यांशी फोनवरुन आपण संपर्कात होतो याचीही कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३0 वर्षांच्या अबू जिंदाल याला २१ जून रोजी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. सौदी अरेबियातून प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला भारतात आणले गेले. यानंतर दिल्लीच्या विमानतळावर विशेष तपास पथकाने त्याला जेरबंद केले. दिल्लीच्या न्यायालयाने त्याची १५ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.
इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. शस्त्रास्त्र व स्फोटकांचा वापर तसेच दहशतवादी कारवायांत तो सहभागी आहे. लष्कर ए तोयबासोबतच इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसोबतही त्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. २00२ च्या गुजरात दंगलीनंतर प्रतिबंधित ‘सीमी’ने त्याचे ब्रेनवॉश केले होते, तेव्हापासून तो लष्कर ए तोयबाचा चाहता झाला होता.