मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सहमालक आणि चित्रपट अभिनेता शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर पाच वर्षांसाठी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी ही घोषणा केली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या संदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही, हा संदेश या निर्णयातून दिला जाईल. कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास ती व्यक्ती कोण आहे, हे न पाहता,त्यावर कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेत सांगितले.शाहरुखने मैदानावर गैरवर्तन करूनही त्याने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला व उलट आपल्या कृतीचे समर्थनच केले. त्यामुळे बंदीची ही कारवाई करावी लागले, असे देशमुख यांनी सांगितले. मैदानावर जाण्यासाठी परवानगीची गरज असते. मी स्वतःही कधी परवानगी नसेल तर मैदानात जात नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.