गणितातील जी थिअरी सोडवताना साक्षात आयझॅक न्यूटन यांनाही घाम फुटला होता, गेल्या ३५० वर्षांत ज्या सिद्धांताची उकल भल्या-भल्या गणितज्ज्ञांना करता आली नाही, असं अत्यंत किचकट कोडं भारतीय वंशाच्या एका तरुणानं अगदी चुटकीसरशी सोडवून सगळ्यांनाच थक्क केलंय. शौर्य रे असं या पठ्ठ्याचं नाव असून तो जर्मनीतल्या शाळेत शिकतोय. त्याचं वय आहे, १६ वर्षं…
सर आयझॅक न्यूटन या थोर शास्त्रज्ञानं फंडामेन्टल पार्टिकल डायनॅमिक थिअरी मांडली खरी, पण अणूंच्या गतीचं गणित सोडवणं त्यांना काही जमलं नव्हतं. त्यानंतर या सिद्धांतावर कितीतरी चर्चासत्रं झाली, तर्कवितर्क लढवले गेले, विज्ञान आणि गणितातल्या रथी-महारथींच्या मेंदूचा भुगा पडला, पण त्याची उकल झाली झाली नाही.
शौर्यनं लावलेल्या शोधामुळे शास्त्रज्ञांना फेकलेल्या चेंडूचा टप्पा आणि मार्ग याचा अचूक अंदाज बांधता येईल. तसंच, हा चेंडू भिंतीवर आदळल्यानंतर कसा उसळेल, हेही ते नेमकं सांगू शकतील.
शौर्य रे हा मूळचा कोलकात्याचा असून तो चार वर्षांपूर्वीच जर्मनीला स्थायिक झालाय. त्याची विद्वत्ता पाहून शाळेनं त्याला थेट दोन इयत्ता पुढे नेऊन बसवलंय