राज्यसभेचे सदसत्व हा तर माझा गौरव आहे. याचा अर्थ मी राजकारणात जाणार असा अजिबात नव्हे. क्रिकेट हा माझा श्वास आहे आणि शेवटपर्यंत क्रिकेटपटूच राहणार असे सांगत सचिन तेंडुलकरने गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. खासदारकीची ऑफर सचिनने मान्य केल्यावर राजकीय धुळवड रंगली. राजकीय पक्षांसह समाजातील सर्वच थरातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यावर सचिन आज पहिल्यांदाच पुण्यातील एका कार्यक्रमात बोलला.
तो म्हणाला, ‘‘राष्ट्रपतींनी राज्यसभेच्या खासदारपदासाठी माझ्या नावाची शिफारस करणे, हा मी माझा गौरव समजतो. लतादीदी, पृथ्वीराज कपूर यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळणे, ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. सातत्याने साडेबावीस वर्षे देशासाठी खेळत असल्याने हा सन्मान मिळाला असावा, असे मला वाटते.’’
‘‘मी काही राजकारणी नाही. त्यामुळे राजकारणात येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.