आपापल्या देशांमधल्या अणुउर्जाप्रकल्पांना चालना देण्यासाठी दाखला देण्यात येणारा जपान हा देश मात्र आज शनिवारी अणुऊर्जामुक्त झाला आहे. शनिवारी जपानने आपला ५० वा आणि शेवटचा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प देखभालीसाठी बंद केला आणि गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच जपान अणुऊर्जामुक्त झाला आहे. अणुऊर्जेच्या विरोधातले चिन्ह बनलेले भव्य माशाचे चित्र फडकावत अणऊर्जेच्या विरोधात आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या सुनामीनंतर आणि फुकुशिमा येथील अणुऊर्जा प्रकल्पाची वाताहत झाल्यानंतर सर्व अणुऊर्जा प्रकल्प तपासणीसाठी बंद करण्यात आले, परंतु त्यानंतर लोकांमध्ये असलेल्या भीतीमुळे ते पुन्हा सुरूच करण्यात आलेले नाहीत. शनिवारी ५ मे रोजी जपानने तोमारी हा सुरू असलेला शेवटचा अणुऊर्जा प्रकल्पही तपासणी व देखभालीसाठी बंद केला आणि गेल्या चार दशकात असे प्रथमच झाले की जपानमध्ये अणुऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्माण होणे थांबले आहे.