अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचे तीन दिवसांच्या दौ-यासाठी रविवारी भारतात आगमन झाले.
क्लिंटन रविवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथून विमानाने निघून कोलकाता येथे पोहोचल्या. विमानतळावर स्वागत झाल्यानंतर त्या कोलकात्याच्या दक्षिण भागातील एका हॉटेलकडे रवाना झाल्या. रविवारी त्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देतील. सोमवारी सकाळी ११ वाजता त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची रायटर्स बिल्डिंग या सचिवालयाच्या इमारतीत भेट घेतील. तत्पूर्वी क्लिंटन शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचीही भेट घेणार आहेत. क्लिंटन आणि ममता यांच्या भेटीत भारत-बांगलादेश संबंध आणि तिस्ता नदी पाणीवाटप प्रश्न आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोलकात्याला क्लिंटन यांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी १९९७ साली त्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणजे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून कोलकात्यात मदर तेरेसा यांच्या अंत्यविधीला हजर राहिल्या होत्या.