शत्रूची आपल्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करणारी स्वदेशी यंत्रणा (बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स) कार्यान्वित करण्यास सज्ज झाली असल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष व्ही. के. सारस्वत यांनी दिली.
भारतातच विकसित करण्यात आलेल्या या यंत्रणेचा पहिला टप्पा अल्पावधीत देशाच्या दोन महत्त्वाच्या शहरांत कार्यान्वित होऊ शकतो, असे सारस्वत म्हणाले. पहिल्या टप्प्यात शत्रूने डागलेली २००० किलोमीटर पल्ल्याची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी पृथ्वीच्या वातावरणात आणि वातावरणाबाहेर म्हणजे ८० ते १५० किलोमीटर उंचीवर येणारे क्षेपणास्त्र नष्ट करणारे क्षेपणास्त्र बनवण्यात आले आहे. त्यासह शस्त्रूचे क्षेपणास्त्र शोधणारे रडार, त्यादिशेने आपले क्षेपणास्त्र सोडणारी स्वयंचलित यंत्रणा आदी बाबी देशातच विकसित केल्या गेल्या आहेत.