ते सुख काय सांगो, वाचे बोलता नये | आरतीचेनि गुणें, गेलें मीपण माये –||धृ ||
फळले भाग्य माझे, धन्य झालो संसारी | सद्गुरू भेटला हो, तेणे धरीयेलें करीं |
पश्चिमेसी चालविलें, आत्म स्थिती निर्धारी | त्रिकूटावरी नांदे, देखियेली पंढरी || १|| ते सुख काय सांगो….
राउळामाजी जातां, राहे देव अवस्था | मन हे उन्मन झाले, नसे बद्धतेची वार्ता |
हेतू हा मावळला, शब्दा आली नि:श्ब्द्ता | तटस्थ होऊनी ठेलो, नीज रूप पाहतां ||२|| ते सुख काय सांगो…..
त्रिगुण गुण बाई, पूर्ण जळाल्या वाती | नवलाव अविनाश, न समाये स्वयंज्योती |
पाहता लक्ष तथें, हालउं विसरल्या पातीं | नातुडे माझे मज, नाही दिवस ना राती ||३|| ते सुख काय सांगो …..
आनंद सागरांत, प्रेमे बुडी दिधली | लाधलें सौख्य मोठें, न ये बोलता बोली |
सद्गुरू चेनी संगें, ऐसी आरती केली | निवृत्ती आनंदानें, तेथें प्रवृत्ती निमाली ||४ || ते सुख काय सांगो …..