सुटीचा मौसम सुरू होण्यापूर्वीच विमान कंपन्यांनी अघोषित रूपाने १५ ते २0 टक्के भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीचा सर्वाधिक फटका हा मुंबई-दिल्ली, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-चेन्नई या आणि अशा व्यस्त मार्गांना बसला आहे. आर्थिक गर्तेत अडकलेल्या किंगफिशरची सेवा अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. परिणामी, विविध प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी विमानांची संख्या तुलनेने कमी आणि बुकिंग जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष सुट्टय़ा सुरू झाल्यावर मागणीमध्ये मोठी वाढ होईल आणि दरवाढीची टक्केवारी २५ टक्क्यापर्यंत पोहोचेल, असा अंदाज या क्षेत्रातील लोक व्यक्त करीत आहेत.