कानात आवाज ऐकू येणे

Like Like Love Haha Wow Sad Angry 3011 कानात आवाज येणे, हा एक त्रासदायक अनुभव असतो. अनेक प्रकारचे आवाज ऐकू...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
3011

ear internal problem

कानात आवाज येणे, हा एक त्रासदायक अनुभव असतो. अनेक प्रकारचे आवाज ऐकू येऊ शकतात. घंटा वाजते आहे, फुग्यातून हवा बाहेर पडते आहे, पाणी वाहते आहे, कानाला शंख लावला तर येणाऱ्या आवाजाप्रमाणे आवाज येतो आहे, पाणी उकळत आहे, किडा किंवा डासासारखा कीटक कानाजवळ गुंजारव करीत आहे, अशा अनेक प्रकारचे ध्वनी कानात ऐकू येतात. क्वचित एखाद्या वन्य श्‍वापदाच्या गर्जनेप्रमाणे, तर क्वचित एखाद्या संगीताच्या वाद्याच्या गुंजारवाप्रमाणेदेखील आवाज येऊ शकतात. काहींना एकाच बाजूने तर काहींना दोन्ही बाजूंनी असे आवाज येतात. काहींना थांबून थांबून तर काहींना सतत येतात. बऱ्याच रुग्णांना या त्रासाची सवय होते, पण काहींना हा त्रास असह्य होतो. काहींना तो आवाज कानात येत असल्याचे जाणवते, तर काहींना तो डोक्‍यात होतो आहे असे वाटते. कानाचे आजार हे असे आवाज ऐकू येण्याचे प्रमुख कारण आहे.

कधी कधी रक्तवाहिन्यांतील दोष, काही औषधांचे परिणाम, चिंता, खिन्नता किंवा वाढत्या वयामुळे झालेल्या श्रवणदोषानेदेखील असे आवाज ऐकू येऊ लागतात. असा आवाज येण्याच्या कारणांपैकी काही गंभीर असतात. त्यापैकी एक म्हणजे कानातून मेंदूकडे जाणाऱ्या मज्जातंतूंच्या शिरेवर गाठ येणे, हे होय. एकॉस्टिक न्यूरोमा. उजव्या किंवा डाव्या बाजूपैकी एकीकडे आवाज ऐकू येऊ लागतो. हळूहळू त्या बाजूने ऐकण्याची क्षमता मंदावते. रुग्णाला चालताना तोल सांभाळता येत नाही. स्थिरता गमावली जाते. चेहरा वाकडा होतो, डोके दुखू लागते, मळमळते, उलटी होते. डोळे तपासून डोळ्याच्या नसेवर सूज आलेली तज्ज्ञ डॉक्‍टरांना कळू शकते. हा आजार बरा करण्याकरिता शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढणे, हेही एक गंभीर कारण आहे. डायास्टॉलिक प्रेशर 120 मिलिमीटर्स मर्क्‍युरी यापेक्षा जास्त होते तेव्हा डोक्‍यात दोन्ही बाजूंना आवाज होऊ लागतात, डोक्‍यात स्पंदनात्मक वेदना होतात, रुग्ण अस्वस्थ होतो, मळमळ होते, उलटी होते, नजर अस्पष्ट होते, फिट्‌स येतात आणि जाणिवेची पातळी खालावते. अशा रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करून शिरेत औषधे देऊन रक्तदाब तत्काळ कमी करण्याची आवश्‍यकता असते. कानाच्या पडद्याला भोक पडणे हे एक नेहमी आढळणारे कारण होय. जितके भोक लहान तेवढा आवाज मोठा असतो. भोक मोठे झाले की ऐकू न येण्याची समस्या बळावते. सहसा या तक्रारी अकस्मात सुरू होतात. कान दुखतो, रुग्णाला चक्कर जाणवते आणि कान गच्च झाल्याची भावना येते.

how ear seem internallyरक्तक्षय झाल्यावर हलक्‍या आवाजाचा कानात त्रास होतो. रुग्णाचा रंग पांढुरका दिसतो, रुग्णाला थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, हलक्‍या श्रमांनी धाप लागते, नाडीची गती जलद होते, मानेवर स्टेथोस्कोपने “मरमर’ ऐकू येते. मानेत मेंदूला रक्त नेणारी “कॅरॉटिड’ आर्टरी असते. रोहिणीकाठिण्य विकारात ती रोहिणी अरुंद होते. अरुंद रक्तवाहिनीतून रक्त वाहताना हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर झरा वाहताना यावा असा आवाज त्या बाजूच्या कानात येतो. कॅरॉटिड रक्तवाहिनीवर मानेत दाब दिल्याने हा आवाज बंद होतो. त्या कानावर व मानेत “मरमर’ ऐकू येते. मानेत मणके असतात. या मणक्‍यांत वार्धक्‍यामुळे झीज होते. सर्व्हायकल स्पॉंडिलायसिस या मणक्‍यातून मेंदूला व्हर्टिकल आर्टरीत रक्त नेतात. या व्हर्टिकल आर्टरीत वर दाब आल्याने तेथे आवाज येऊ लागतो, रुग्णाला अधूनमधून चक्कर येते, ऐकण्यात दोष वाटतो, हातापायांना मुंग्या येतात, खांदे व हातात वेदना जाणवतात, कानात मळ साचण्याने अथवा एखादी वस्तू अडकल्याने कानात आवाज येतो, ऐकू येत नाही, कानास खाज सुटते, कान गच्च झाल्याची भावना होते. आतल्या कानात जीवाणूंमुळे दाह झाला की कानांत आवाज येणे, ऐकू न येणे, चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे असे त्रास होऊ लागतात. या भागात होणारा एक नेहमीचा आजार म्हणजे मिनिअर्स डिसीज. कानात आवाज येणे, चक्कर येणे, कान गच्च होणे, अशा त्रासांच्या लाटा येतात. दर वेळी त्रास दहा मिनिटांपासून कित्येक तास टिकतो. रुग्णाला मळमळते, उलटी येते, घाम सुटतो. ऑटोस्लेरोसिस या आजारात रुग्णाची प्रमुख तक्रार ऐकण्यास न येण्याची असते; परंतु कानात आवाज येणे व चक्कर येणे असाही त्रास होतो.

काही औषधांचा कानावर परिणाम होतो. सॅलिसिलेट प्रकारच्या औषधांचा हा परिणाम फार पूर्वीपासून वैद्यक शास्त्राला ज्ञात आहे. त्याचे सर्वविद्‌ उदाहरण म्हणजे अस्पिरिन याचा मोठा डोस दीर्घ काळ घेण्याने कानात आवाज येणे, ऐकू न येणे, चक्कर येणे असे त्रास होतात. पूर्वी मलेरियाच्या आजारात क्वीनिन वापरले जाई. त्याचाही असाच परिणाम होत असे. मद्यपानानेही हाच दोष होतो. संधिवातासाठी एण्डोमेथॅसिन नावाचे एक औषध वापरले जाते. अमायनो ग्लायकोसाईड प्रकारची प्रतिजैविके आजही वापरली जातात. (जेंटामायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, केनामायसिन) या सर्व औषधांनी कानावर विपरीत परिणाम होणे संभवते. सतत कानावर मोठा आवाज पडण्याने कानातील पेशींना अपाय होतो व कानात आवाज येऊ लागतो. कानांत येत राहणारा आवाज, ही एक तापदायक समस्या ठरू शकते.

डॉ. ह. वि. सरदेसाई

News source : www.  globalmarathi.  com

रोगान संबंधी अधिक माहिती तुम्हाला मराठी अनलिमिटेड वर मिळेल. आमचे लेख नियमित वाचत रहा.

धन्यवाद.

www.marathi-unlimited.in

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3011

Related Stories