131
जयदेव जयदेव जय पांडूरंगा | रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा भावे जिवलगा ||धृ||
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ||
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा –||१||
तुळसी माळा गळां कर ठेवुनी कटी | कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी ||
देव सुरवर नित्य भेटी येती | गरुड हनुमंत पुढे उभे राहती –||२||
धन्य वेणू नाद अनु क्षेत्र पाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळां ||
राही रखुमाबाई राणीया सकळा | ओवाळीती राजा विठोबा सांवळा– ||३||
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती | चंद्रभागेमाजी सोडूनियां देती ||
दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती–||४||
आषाढी कार्तिकी भक्त जन येती | चंद्र भागे माजी स्नान जे करिती ||
दर्शनहेळा मात्रे तयां होय मुक्ती | केशवासी नामदेव भावे ओवाळ्ती–||५||
131