आजही आठवतात ते दिवस
“पोटात खूप दुखतंय ग”
असं खोटखोट आईला सांगून
शाळेला मारलेली दांडी||
आणि “जास्त दुखतंय का रे”
असं म्हणत आईने भरलेला
तो कडू औषधाचा ग्लास
आणि बघून झालेली कोंडी ||
त्या दिवशी शाळेत शिकवलेल्या
अभ्यासाच्या वह्या संध्याकाळी
माझ्यासाठी माझ्या घरी घेऊन
आलेला “तो” मित्र ||
आणि त्याच्याच वहीच्या
शेवटच्या पानावर
मी रेखाटलेलं
त्याचंच व्यंगचित्र ||
वर्गात मस्ती केल्यामुळे
बाईंचा खाल्लेला मार…
मधल्या सुट्टीत
१ रुपयाचा मस्त
काला खट्टा थंडगार ||
परीक्षेच्या वेळी मात्र
पोटात यायचा नाही गोळा…..
कारण आईचा मार नको म्हणून
पाठांतर केलेलं असे अनेकवेळा ||
रिझल्ट लागण्या आधीच
पुढच्या ईयत्तेची केलेली असे तयारी…
कारण तेव्हा आमचा
“आत्मविश्वास” होता भारी ||
आता apprisal आणि promotion च्या
चढाओढीत फक्त राहिल्यात
मनात जपून ठेवलेल्या “त्या” आठवणी. ||
कविकुमार-