निसर्ग – आपण काय करू शकतो?




Like
Like Love Haha Wow Sad Angry
441

We all know Nature is our god. read this article for how nature is important for us.

paryavaran article

मला अजूनही आठवतं, माझ्या लहानपणी ३३ अंश सेल्सियस हे मुंबईतील उन्हाळयातलं महत्तम तापमान असायचं. यावर्षी एप्रिल महिन्यातच ३६ अंश सेल्सियस पार केलं.

विकास करताना पर्यावरणाकडे केलेल्या दुर्लक्षाचाच हा परिणाम आहे.

पाच सात वर्षांपूर्वी मी पहाटे पहाटे व्यायाम म्हणुन सायकलने फेरफटका मारायला बाहेर पडत असे. अशावेळी परेल ते भायखाळा असा प्रवास असे. पहिल्याच दिवशी सायकल चालवताना अचानक हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. थोड्याच अंतरावर राणीच्या बागेची हद्द सुरू झालेली दिसली. पुढे हाच अनुभव रोज यायला लागला.

सांगण्याचा मुद्दा हा, की जर फक्त एवढा लहानसा वृक्षांनी अच्छादलेला जमिनीचा तुकडा जर वातावरणात जाणवण्या एवढा फरक करू शकतो तर नक्कीच एकंदरीत परिस्थिती सुधारता येऊ शकते.

पण सुरवात मात्र स्वतः पासुनच करायला हवी.

फक्त चर्चा करुन काय उपयोग? प्रत्यक्ष कृती करायला हवी.

आपल्या सोसायटीत, रस्त्यांच्या कडेला, आपल्या मैदानाशेजारी जमेल तिथे झाडे लावायला हवीत.

रस्त्यांच्या कडेला इतकी झाडे हवीत कि दुपारचं तळपतं उन जाणवायला नको.

आणि यात अशक्य काहीच नाही.

आणि झाडेही इथल्या हवामानाला आणि पशूपक्ष्याना साजेशीच असायला हवीत. गुलमोहर सारखी झाडे दिसायला कितीही सुंदर असली तरी ती येथील पशुपक्ष्याना फळे, मध आणि निवार्‍या साठी पुरेश्या भरगच्च फांद्या देतात कि नाही हे तपासून मगच झाडे लावायला हवीत.

स्थानि़क झाडे निवडायला हवीत.

बरं झाडे लावता येत नाहीत आणि आहेत ती टिकवूनही ठेवता येत नाहीत. ज्याना झाडे लावता येत नसतील त्यानी इथे नमूद केलेल्या गोष्टी करून पहाव्यात. कागद हा झाडांपासून तयारा होतो हे काही नव्याने सांगायची गरज नाही. वापरून झालेला कागद हा कचरा म्हणून न फेकता तो रद्दी मध्येच द्यावा. वापरुन झालेला कागद म्हणजे फक्त वर्तमान पत्राचा कागद असा गैरसमज करुन घेऊ नका. वाण्याच्या दुकानातून एखादी वस्तू बांधून आणलेला कागद, नको असलेल्या झेरॉक्सचे कागद, निवडणुकांच्या काळात आपल्या नेते मंडळींनी वाटलेली प्रसिद्धी पत्रके इ. गोष्टी सुद्धा रद्दीतच द्या.

यासंदर्भात आणखीन एक गोष्ट सांगाविशी वाटते. काही वर्षापूर्वी एका वर्तमान पत्रामध्ये पर्यावरण विषयक एक सदर प्रसिद्ध झालं होतं. त्यात एक महत्वाची गोष्ट सुचवली होती. पालक मुलांसाठी दरवर्षी नवीन वह्या पुस्तके विकत घेतात. मागील वर्षीच्या वह्या सर्रास रद्दी मध्ये दिल्या जातात. पण त्या वह्यांमधील किती वह्याची किती पानं कोरीच होती हे पाहीलं जातं का? त्या कोर्‍या पानांचा उपयोग पुढील वर्षा साठी केला जाऊ शकत नाही का? मग मी हा प्रयोग करुन पहायचं ठरवलं. त्यावर्षी मी बारावी विज्ञान वर्षाला असल्या कारणाने बरंच कच्चं लिखाण करायला लागायाचं. मी त्यासाठी वर्तमान पत्रात सांगितल्या प्रमाणे रद्दी मधील कोरे कागद वापरायला सुरूवात केली. छापील कागदाची मागील कोरी बाजू सुद्धा उपयोगात आणली. आणि काय सांगू मंडळींनो, ते बारावीचं वर्ष सोडाच पण आजतागायत मी कच्च्या कामासाठी वही खरेदी केलेली नाही! म्हणजे आपण अजाणतेपणाने किती उपयुक्त कागद कचर्‍यात फेकतो त्याचा विचार करा !

या ठिकाणी महात्मा गांधींनी सांगीतलेला एक विचार तंतोतंत लागू होतो. “There is enough for everyone’s need but not for anyone’s greed”

मनुष्य प्राण्याच्या गरजा भागवण्यासाठी हा निसर्ग नक्कीच समर्थ आहे. पण याची चंगळवादाची हौस मात्र हा निसर्ग नाही पुरवू शकत.

आज आम्ही आंधळा विकास साधत आहोत. आणि यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जातोय.

एखाद्या शेतकर्‍याची, त्याच्या आई-वडिलांनी रक्ताचा घाम करून मिळवलेली ,पिकावू शेतजमीन आम्ही विकासाच्या नावाखाली त्याच्याकडुन हिसकावून घेत आहोत. त्याच्या आई-वडिलांनी मुलाच्या मायेनी वाढवलेली झाडं तोडतो आहोत. त्या जमीनीवर आम्ही मोठमोठे कारखाने, कॉरपोरेट सेन्टर्स, उभारात आहोत. या बांधकामा साठी आणि कारखान्यासाठी आसपासच्या विहिरी, तलाव उपसत आहोत. आणि त्यामधील तथाकथीत सुशिक्षीत, उच्चभ्रू तंत्रज्ञांना filtered minerals water पाजत आहोत.

आमचं बांधकाम सुद्धा येथील वातावरणाला बिलकूल साजेसं नसणारं. आमच्या इमारतीच्या भिंती सुद्धा खिडक्या नसलेल्या, बाहेरून छान दिसणार्‍या अत्यंत पातळ अशा काचांपासून बनविलेल्या. त्या फार गरम होतात म्हणून आम्ही आतमध्ये वातानूकूलीत यंत्रणा बसवतो. इंग्रजांनी सुद्धा बांधकामं करताना येथील हवामानाला अनुकूल अशा, भरपुर खिडक्यांच्या हवेशीर इमारती बांधाल्या. आज हे स्वातंत्र्यापूर्व काळातलं तंत्रज्ञान म्हणून आम्ही वापरत नाही, कारण आम्ही आज विकसनशील देशातले आहोत!

या वातानुकूलीत यंत्रणांना फार वीज लागते. ती आम्ही उरल्या सुरल्या शेतकर्‍यांकडे भारनियमन करुन मिळवतो.

विकास करायचा म्हणजे हे सर्व आलंच अशी आम्ही सारवासारवही करतो.

पण आज आम्हाला मातीत हात घालायला लाज वाटते. तर झाडे लावणे दूर.

आम्ही विकसनशील देशातील सुशिक्षीत माणसं. झाडं, पानं, फुलं ह्या सर्व शेतकर्‍यांनी करायच्या गोष्टी. आम्ही का म्हणुन कराव्यात या गोष्टी? ज्याला त्रास होइल तो करील. वातावरणातील उष्णता वाढली तर आम्ही आमचा एअरकंडिशन वापरू! लोडशेडिंग असेल तर जनरेटर वापरू! हवेतील ऑक्सिजन का काय म्हणतात तो कमी झाला तर आम्ही ऑक्सिजनच्या नळकांड्या वापरून कामावर जाऊ.

पण झाडे लावण्याचं आणि पर्यावरणाचं आम्हाला सांगू नका.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
441




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu