दिल्लीत मेगाइव्हेंट उपोषणाचा |
||
दिल्ली येथील फिरोजशहा कोटला स्टेडियमशेजारी दिल्ली गेटजवळ १६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अण्णा हजारे यांच्या बहुचर्चित उपोषणासाठी जयप्रकाश नारायण मेमोरिअल पार्क ‘ सजत ‘ असून , हे उपोषण म्हणजे या पार्कातील पहिलाच ‘ मेगाइव्हेंट ‘ ठरणार आहे .
मध्य दिल्लीत यापेक्षा उत्तम व सोयीस्कर जागा उपोषणासाठी नव्हती ! दिल्ली शहर परिवहनाच्या २१ वेगवेगळ्या माार्गांच्या बसगाड्या येथील बस स्टॉपवरून सुटतात . प्रगती मैदान मेट्रो स्टेशनही या जागेपासून फारसे दूर नाही . इतकेच नाही , तर परराज्यांतून अथवा बाहेरगावहून येणाऱ्या अण्णांच्या समर्थकांनाही हे स्थळ सर्वाधिक सोयीचे आहे ; कारण नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली ही रेल्वे स्टेशनेही जयप्रकाश पार्कपासून जवळ आहेत . म्हणूनच दिल्ली पोलिसांची या जागेविषयीची सूचना अण्णांच्या सहकाऱ्यांनी लगेचच मान्य केली ! बहाद्दूर शहा जफर मार्गावरून जो रस्ता फिरोजशहा कोटला किल्ल्याच्या दिशेने जातो त्या रस्त्यावर डावीकडे हा पार्क आहे . या उद्यानाला एकूण चार प्रवेशद्वारे आहेत आणि सुमारे १५ हजारांची गर्दी या पार्कात सामावू शकते . दहा वर्षांपूर्वी हे उद्यान तयार झाले असले तरी अशा ‘ मेगाइव्हेंट ‘ चे आयोजन येथे पूर्वी कधी झाले नाही . काहींच्या मते या उद्यानाचे औपचारिक उद्घाटनही झाले नव्हते ! मात्र , आता अण्णांच्या उपोषणामुळे साऱ्या देशाचे लक्ष आता हा पार्क वेधून घेईल . |