मराठी ऐवजी इंग्रजी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

information on Marathi yevaji English on marathi unlimited……

                     Marathi yevaji English

मराठी भाषेविषयी मला प्रेम आहे. ज्याची मायबोली मराठी आहे, तो आपले रडाण्या-हसण्या-रागावण्याचे, सर्व व्यवहार मराठीतूनच सहजपणे व चांगल्याप्रकारे करु शकेल, याविषयी माझ्या मनात तिळमात्र संशय नाही. रडण्या-हसण्या-रागावण्याचे म्हणजे दुःख, आनंद व क्रोध या भावना व्यक्त करण्याचं, असं मला म्हणायचं आहे. मराठी भाषिकाला नवा विषय मराठी माध्यमाऐवजी इंग्रजीतून शिकवला तर त्याला तो विषय अवघड जाणारच. कारण त्याला प्रथम इंग्रजी शिकणं आलं आणि वर पुन्हा नवा विषय इंग्रजीतून शिकणं आलं, म्हणजे दुप्पट व्याप झाला.विद्यालयीन शिक्षणाचे माध्यमिक व महाविद्यालयीन असे दोन स्तर आहेत. या दोन्हीही स्तरावर मराठी या माध्यामाच्या जोडीने इंग्रजीची गरज पूर्वी होती. आज तर ती गरज वाढलीच आहे. असं मला व्यवहाराचा चष्मा लावल्यावर स्पष्टपणे दिसते.

सर्व विषय मराठी माध्यमातून शिकणं सोयीचे आहे हा निष्कर्ष मान्य करणं भागच आहे. या सर्व विषयत इंग्रजी हाही विषय हवा व तो मराठीतून शिकावा एवढीच माझी आग्रहाची सूचना आहे.

माध्यमिक शाळेत इंग्रजी, इतिहास, भूगोल, संस्कृत, चित्रकला, संगीत, नागरिकशास्त्र यासारखे विषय मराठीतून शिकावेत व शिकवावेत. हे विषय शिकण्यासाठी लागणारी पाठ्यपुस्तके व संदर्भपुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. विषयांच्या वरील यादीत इंग्रजी हा विषय शिकण्याचा म्हणून घातला आहे, शिकवण्याचे माध्यम म्हणून नाही. शिकवण्याचे माध्यम मराठीच हवे.

मात्र गणित व पदार्थविज्ञान- रसायन- जीव हे शास्त्रविषय माध्यमिक शाळेपासूनच इंग्रजीतूनच शिकावावेत. त्यात सोय आहे असे मला वाटते. इंग्रजी या भाषेची तोंडओळख प्राथमिक शाळेत पहिलीपासूनच करुन द्यावी. तोंडओळख म्हणजे नेमकेपणाने बोलायच तर A. B. C. D……a b c d ही इंग्रजी वर्णाक्षरे, कॅट-रॅट-मॅट-लायन-शीप-काऊ यांसारखे सोपे शब्द आणि माय नेम इज राम, आय वॉन्ट मिल्क, गिव्ह मी अ बिस्कीट अशी वाक्ये प्राथमिक शाळेत पाठ म्हणून घ्यावीत. वाक्यरचना, व्याकरण याबाबात अवाक्षरही बोलायचं नाही. आज अशी तोंडओळख मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळेत करुन देतात. माध्यमिक शाखेतील पाचवी, सहावी व सातवी या तीन वर्षात सर्व विषय, यांत इंग्रजीही अलेच, मरठीतून शिकवावेत. अपवाद फक्त गणित विषयाचा करावा. गणित विषयाचा करावा. गणित हा विषय इंग्रजीतून शिकवावा +, -, x, = ही चिन्हे तीच आहेत. गणित विषयाला लागणारे इंग्रजी फार थोड्या शब्दांपुरते मर्यादित ठेवता येते. गणित हा बऱ्याचसा शास्त्रीय विषयांशी चुलत-मामे-आते अशा कोणत्या ना कोणत्या नात्याने संबंधित आहे. म्हणून तो इंग्रजीत शिकवणे सोयीचे होईल.

वरील विषय महाविद्यालयाच्या स्तरावर आज इंग्रजीतून शिकविले जातात व उद्याही इंग्रजीतूनच शिकवले जाणार. कारण महाविद्यालयच्या पातळीवरचे विषय समजून देणारी पाठ्यपुस्तकं, संदर्भग्रंथ हे इंग्रजी भाषेत आहेत, मराठीत नाहीत. यासाठी गणित-शास्त्रे हे विषय माध्यमिक शाळेपासूनच इंग्रजीत शिकविणे सोयीचे ठरणारे आहे. इंग्रजी हा विषय शिकण्याची गरज आहे. अस मी वर नमूद केल आहे ते याचसाठी.

आठवीपासून गणिताबरोबरच सर्व शास्त्रविषय इंग्रजीतून शिकविणे का सोयीचे ठरेल, हे वर स्पष्ट केले आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या कक्षा ज्या वेगाने विस्तारित आहेत त्या वेगाने ते ज्ञान मराठीत येत नाही. आपण मराठी माध्यमाचा हट्ट धरला तर आपण सतत मागे पडू.

कॉम्प्युटर हे यंत्र विद्यार्थ्यांच्या सर्रास वापरात येत आहे. रेडिओ, फ्रीज, वॉशिंग मशीन या यंत्राच्या बरोबरीने नव्हे तर आधी कॉम्प्युटर घरी आणला नाही, तर आपण `कॉम्प्युटर निरक्षर’ अशी परिस्थिती आहे. कॉम्प्युटर खेळ आहेत. मुले खेळणार म्हणजे कॉम्प्युटर वापरणार. बँकांत, रेल्वेस्थानकावर, ग्रंथालयात, शाळेत सर्वत्र मुलांना कॉम्प्युटर दिसणार. घरी येणाऱ्या टेलिफोन-विजेच्या बिलांवरचे आकडे व मजकूर कॉम्प्युटर छापतो. आठव्या-दहाव्या वर्षीच मुलांचे व कॉम्प्युटरचे नाते जोडूनदेणे भाग पडणार आहे. कॉम्प्युटरचा की बोर्डा, आज्ञा देणारे शब्द हे सर्व इंग्रजीत आहेत.

सात-आठ वर्ष वयाचे, इंग्रजी विषयांशी तोंडओळख असणारे विद्यार्थी कॉम्प्युटर छान हाताळतात, पण ज्यांचा इंग्रजीशी परिचय नाही ते मात्र गोंधळतात. इतर कशाकरिता असो वा नसो, केवळ कॉम्प्युटरच्या वापरासाठी का होईना, प्राथमिक स्वरुपाचे इंग्रजी आज गरजेचे झाले आहे. पाच वर्षापूर्वी तसे नव्हते.

स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा काही होऊ शकली नाही. दक्षिणेच्या राज्यांनी हिंदी स्वीकारलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी ही भावना चुकीची नाही. पण इंग्रजीचा व्यावहारिक राष्ट्रभाषा म्हणून वापर करायला हवा, तसा तो आज न बोलता, होतही आहे.

देशातल्या अठरा-वीस प्रांतातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी असेल, सर्व प्रांतातील नोकरी-व्यवसायांच्या संधी गुणीस्पर्धकांना मिळायला हव्या असतील, तर सर्व विद्यापीठात इंग्रजी माध्यम असणे अगत्याचे आहे. इंग्रजी ही आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची भाषा आहे, ती या भूमीतील भाषा नाही हे खरेच आहे. इंग्रजीचा वापर करताना आपल्यातील काहीजणांना गुलामगिरांची आठवण आली व खंत वाटली तर ते समजणारे आहे.

इंग्रजी भाषा आणि सत्ताधारी इंग्रज यांच्यात फरक करण्याइतपत प्रगल्भता आपल्यात आली पाहिजे. शेक्सपिअरच्या नाटकांचा आस्वाद घेताना, उत्तम इंग्रजी चित्रपट पाहताना, पॅन्ट-कोट-बूट-शर्ट या वस्तूंचा वापर करताना आपण सोय पाहतो, तेच बरोबर आहे. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपलिका, महसूल खाते सरकारी कचेऱ्या या सर्व ठिकाणी मराठी भाषेचा वापर व्हावा. कारण यात सोय आहे. यामुळे साधारण जनतेलाही सर्व व्यवहार समजतात, त्यांची फसवणूक होत नाही.
शिक्षणाच्या माध्यमाची निवड करताना अशी सोयच पाहिली पाहिजे. एकीकडे आपण म्हणायचे की, आपल्याला प्रगत राष्ट्रांची बरोबरी करायची आहे, जागतिक स्पर्धेत आपण मागे पडता कामा नये. कॉम्प्युटर व इंटरनेटमुळे ज्ञानाची, माहितीची, व्यापाराची देवघेव वाढली आहे आणि दुसरीकडे मराठीच्या खिडकीतून जगाकडे पाहण्याचा अट्टहास करायचा हे दोन्ही कसे जमणार? पाणी उंच सुरईत असेल तर ते पिण्याकरिता करकोच्याची लांब चोचही पैदा केली पाहिजे, पाणी उथळ थाळीत असेल तर ते मिळवण्यासाठी लवलवती व पसरट जीभ हवी म्हणजे सोयीची जीभ हवी.

कपडे धुण्यासाठी साबणचुरा वापरताना आपण कपड्यांच्या स्वच्छतेला महत्त्व देवून एरियल व सर्फ हे आपले नसलेले साबणचुरे वापरतो. देशावर नितांत प्रेम करणारे व देशाकरिता दिवसातून दहा वेळा जीव दयावयास तयार असणारे पुढारी जीव वाचवण्यासाठी औषधोपचार करण्याकरिता इंग्लंड अमेरिकेकडे जातात. म्हणजे ते व्यवहार पाहतात त्यात काहीही चुकीचे नाही, याच न्यायाने शिक्षणाचे माध्यम म्हणून भाषेचा वापर करतानाही व्यवहारच पाहिला पाहिजे.

इंग्रजी भाषेचा विद्यालयीन पातळीवर वापर झाला तर वैद्यक, अभियांत्रिकी, जीव, भौतिक, रसायनम अर्थ वगैरे शास्त्रातील अद्यावत ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल. भिन्न भाषिक प्रांतातील ज्ञानाचे व विद्वानाचे शज अभिसरण होईल व सर्व देशाला बांधणाऱ्या व्यावहारिक राष्ट्रभाषेचा आपल्याला लाभ होईल.

भाषेचा प्रश्न हा जास्त करुन व्यवहाराचा आहे. भावना व व्यवहार यात द्वंद्व निर्माण झाले तर व्यवहार विचारात घ्यावा, भावनेच्या भरात वाहू नये. मायभाषेविषयी अभिमान व प्रेम बाळगणे यात चूक असे काहीच नाही. मात्र व्यापार, व्यवहार, नोकरी, धंदा, तंत्रज्ञान यात काही भरीव साधावयाचे असेल तर सोयीची भाषा कोणती हाच विचार करावयास हवा.

स्त्रोत : www.marathimati.com

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu