गोंदण…
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

आज मी साप्ताहिकाच्या कामानिमित्त जुन्नरला गेलो होतो, साप्ताहिकाचे कामकाज झाल्यानंतर दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान मी पुन्हा बस स्थानकावर आलो सध्या पावसाळा सुरू असल्याने सातत्याने संततधार सुरू होती म्हणून खूप सारे प्रवासी विद्यार्थी व महिला वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या त्यांच्या बस गाड्यांची वाट पाहत बस स्थानकातील बाकड्यांवर बसले होते काहीजण गाड्या लागल्या की तसेच पळत सुटायचे काही जण बस स्थानकाच्या आवारात उभे होते, पाणी सगळीकडेच वाहत होते, मी देखील त्या ठिकाणी उभाच होतो काही गडी माणसं तंबाखूचा बटवा काढून तंबाखूला चुना लावून मळत होते काही महिला मशेरी लावत होत्या काहीजण जांभया देऊन तसाच हात तोंडावर ठेवत होते लहाण मुलं रडत होते काहींच्या हातात बाजाराच्या पिशव्या तेल डबे तर काहीजण असेच मजेने फिरायला आलेले होते, कुत्र्यांची पिल्ले तिथेच आळीपिळी देऊन मायेच्या उबेने तिथेच कुडकुडत बसली होती, कुणी तरी येता जाता त्यांच्या अंगावर चालताना पाणी पडले की ती पिल्ले अंग चोरून कुशीत घुसायची.

गाया बकऱ्या तिथेच आवारात गवत खात होत्या, हे निरिक्षण पाहत बराच वेळ मी त्या ठिकाणी उभा होतो माझी पत्रकारितेची नजर मला शांत बसू देत नाही, अशातचं माझं लक्ष गर्दीत उभ्या असलेल्या ७५ ते ८० वर्षाच्या आज्जीकडे गेलं, आज्जीच्या हातात हिरव्या पोपटी रंगाच्या नक्षी नसलेल्या बांगड्या, हाताच्या सपाट भागावर गोंदलेली नक्षी, डाव्या उजव्या गालावर अन नाकाच्या डाव्या बाजूवर एक गोंदलेला टिपका, डाव्या हातात रंग गेलेला एक धागा, गळ्यात जाड अशी तुळशीची माळ, गुडघ्यापर्यंत वर खेचून बांधलेलं लुगडं, डोक्यावर घेतलेला पदर, पायात जुनी तुटलेली चप्पल, अंगात कसलाही त्राण नाही, थोडीशी वाकलेली, अंग व चेहरा पूर्ण सुरकतलेला, लुकलुकणारे बारीकसे डोळे, कुणालाही मायेचा पाझर फुटावा असं तिचं एकंदरीत रूपडं होतं, मला फार आपुलकी वाटली. शेजारी सगळी माणसं उभी होती कुणाला तरी विचारावं गाडी कोणती लागली.

बा ये बाळा कंची रं गाडी लागली?
म्हातारे नाही सांगता येणार जवळ उभा असलेला उत्तर देतो.
आज्जी गप व्हायची.
पण तिची नजर गाडी कधी येणार याकडेच होती यामुळे तिचे डोळे सुकून गेले होते.
शेजारी बाया होत्या.
बाई ये ताई अगं गाडी कंची गं लागली?
आज्जे मला नाय माहीती असं ती बाई बोलायची.
जवळच्या कंबरेला हात घालून मशेरीची डबी काढली अन् त्यातून हातावर मशेरी घेतली तोंडात घातली तशीच मशेरी जिभेने ओठावरून फिरवली. तसं तिचं लक्ष माझ्याकडं गेलं माझ्याकडं पाहताच तिनं मला विचारलं.
बाळा ह्या गाड्या कंच्या लागल्यात.
तसा मी म्हणालो आज्जी आंबोली आणि अंजनावळे लागल्यात.
आज्जी मायेने बोलत होती, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या गाड्यांची वाट पाहत होता, आज्जी तशीच तिथं उभी होती निरागसपणे ती लोकांकडे पाहत होती, तिला कोणीतरी मदत करावी असं तिला वाटतं होतं, थोडा पाऊस थांबला तोच लोकांची पळापळ सुरू झाली, गच्च गाड्यांमध्ये लोकं एकमेकांना ढकलत पुढे सरकवत रेटत बसच्या दारातून चालत होते, मी मात्र आज्जीला शोधत होतो, गर्दीत कुठं कोण तिला मदत करणार नाही म्हणून मी गाड्या शोधत होतो, एका बस मधून आज्जीनं उभ्यानेच मला हात केला गाडी कोणती होती हे सांगता येणार नाही मी तसाच गाडीत शिरलो गाडी गच्च भरलेली होती तेवढ्यात कंडक्टर आला चला पुढे मागचे सरका बरं पुढे…आज्जी तिथचं उभी होती मी एकाला सांगितलं आज्जीला जागा द्या ना.
इथं आम्हालाच जागा नाही आणि आज्जीला कुठून जागा देऊ वय झालय तर घरी बसायचं ना गाडीत कशाला गर्दीला यायचं.
मी म्हणालो तुम्हाला आई असेल ना तिला बोलाल का असं.
जागा नका देऊ पण आदर तर करा.
कंडक्टर:- म्हातारे चल पुढं.
आज्जी:- बा जागा कर रे मला.
कंडक्टर:- तुच विचार लोकांना अन् कर जागा.
तोपर्यंत मी एकाला झापत होतो कशीबशी आज्जीला एका बाबांपाशी जागा केली आज्जीनं मायेनं तोंडावरून हात फिरवला किती बरं वाटलं, एक चांगली मदत केल्यामुळे तेवड्यात ड्रायव्हर आला मला बाहेर निघायला जागाच नव्हती कसाबसा बाहेर आलो लोकं माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते.
आपणही या जुन्या जाणत्या लोकांना मदत करा तुम्हाला चांगले आशिर्वाद मिळतील.
हे आपले कर्तव्य आहे, खर्‍या अर्थानं ते पार पाडलेच पाहिजे.

लेखक:- सतिश संतोष शिंदे.

  • M.A. Politics, Journalist, Author, Poet.
  • At. Botarde Post. Khangaon Tal. Junnar Dist. Pune 410502
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: