पूर्णगड किल्ला
मुंबई पणजी महामार्गावर हातरवांबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे. पावसमध्ये स्वामी स्वरुपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे. गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
पुर्णगड गावातून पायर्यांच्या मार्गाने १० मिनिटात आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दारा समोर हनुमंताचे मंदिर आहे. प्रवेशव्दार दोन बुरुजांच्या मध्ये लपवलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस देवड्या आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा छोटासा आवाका ध्यानात येतो. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूला दग्डावर कमळ फुल कोरलेली आहेत. समोरच एक मोठा चौथरा असून त्याच्या मागे किल्ल्याचा समुद्राच्या बाजूचा दरवाजा आहे. उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष असून डाव्या बाजूला एक समाधीचे तुळशी वृंदावन आहे.किल्ल्यात शिरल्यावर उजव्या बाजूला असलेल्या जिन्याने फांजीवर चढून गड प्रदक्षिणेला सुरुवात करावी . एक एक बुरुज ओलांडत आपण समुद्राच्या बाजूला येतो. येथे तटबंदीचा काही भाग ढासळलेला आहे. याठिकाणी फ़ांजी वरुन खाली उतरावे. य्रेथे समुद्राच्या बाजूचे प्रवेशव्दार अजूनही सुस्थितीत आहे. प्रवेशव्दार पाहून परत फांजीवर चढून मुख्य प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गड पाहाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. *किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे. गडामध्ये गडकर्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो.