“करोना महात्म्य” भाग एक
Like
Like Love Haha Wow Sad Angry
61

Corona Mahatmya

होय…. करोना महात्म्यच. गेल्या काही दिवसापासून माझ्या आकलनाप्रमाणे मी करोना या विषयावर लिहितोच आहे पण यानंतर थोडीशी सुसंगती यावी आणि या स्फुट लेखांचा एकत्रित संग्रह व्हावा म्हणून सलग लेखमाला लिहिण्याचा विचार करतोय.

या लेखमालेला नाव काय द्यायचे… असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा नाव “करोना महात्म्य” असे ठेवणे मला जास्त संयुक्तिक वाटले. असे वाटण्याचे कारण असे की, सहसा माहात्म्य थोर पुरुषाचे, थोर व्यक्तीचे लिहिले जाते आणि करोना व्यक्तीही नाही आणि थोरही नाही असे सकृद्दर्शनी वाटत असले तरी सुद्धा हेच नाव निवडण्याचा उद्देश असा की, आजच्या करोनाच्या स्थितीवरून उद्याच्या भविष्याचा वेध घेतला तर मला जरा स्पष्टपणे जाणवते आहे की, एकंदरीत करोना हा खलनायक न ठरता मानवजातीसाठी नायक ठरण्याचीच शक्यता जास्त आहे.

संपूर्ण जागतिक मानवजातीच्या संस्कृतीची, अर्थव्यवस्थेची, विचाराची, राजकारणाची आणि समाजकारणाची दिशा सुद्धा करोना  बदलून टाकेल असे धूसर असे चित्र आज दिसायला लागले आहे. हे खरे आहे की करोनामुळे मनुष्यहानी होणार आहे पण जेव्हा जेव्हा युद्ध झाले, क्रांती झाली, जागतिक बदल झालेत तेव्हा तेव्हा मनुष्यहानी झालेलीच आहे. त्यानंतरच समाजव्यवस्थेची नव्याने पुनर्स्थापना झालेली आहे. त्यामुळे करोनामुळे मानवीविश्वाची जरी प्राणहानी झाली तरी पूर्वइतिहास लक्षात घेता करोनाला खलनायक ठरवता येणार नाही.

करोनामुळे समाज सुधारला, बेशिस्त जनजीवन शिस्तीत आले, अहंकाराची जागा विनयतेने घेतली, शोषक आणि शोषित यांच्यातली दरी कमी झाली, अन्यायाची जागा न्यायाने घेतली, माणूस माणसासारखा वागायला लागला, माणूस माणसाचा सन्मान करायला लागला, किडलेल्या मनातील अनेक दर्प निघून गेले तर….. मानवजातीवर करोनाने अनंत उपकारच केले….. अशी दखल घेण्यास इतिहासाला भाग पडेल.  दुसरा भाग असा की, करोना आक्रमणकारी नाही. करोना कुणाचा जीव घेतच नाही. माणसाचा बळी घेत नाही. हे सर्व ज्ञात आहे की करोना एक निर्जीव पार्टीकल असून त्याला स्वतः चालता-बोलता-उडता येत नाही. तो कुणावर आक्रमण करू शकत नाही. तो तसा निर्गुण-निर्विकार आहे.

याउलट माणसाचा बळी घेण्यास माणसेच कारणीभूत ठरत आहेत, ठरणार आहेत. जर करोनाचा जन्म चीनमध्ये झाला असेल तर तो समग्र जगामध्ये नाचायला-उडायला-बागडायला आणि माणसाचे जीव घ्यायला स्वतःहून गेलेला नाही. माणसांनीच त्याला चीनमधून उचललं आणि स्वखर्चाने वेगवेगळ्या देशात नेऊन ठेवलं. एका माणसाने दुसऱ्या माणसाला करोना सस्नेह भेट म्हणून दिला. एका हाताने दुसऱ्या हाताला आणि एका तोंडाने दुसऱ्या तोंडाला घास भरवावा तसा करोना भरवला. जर दोष माणसाचा असेल तर त्याचे पाप करोनावर ढकलण्याचे कारणच काय?

जोपर्यंत कोणताही मनुष्य करोनाला घ्यायला जाऊन…. त्याला आपल्या घरात घेऊन येत नाही, घरात आल्यानंतर जोपर्यंत कोणताही माणूस त्याला आपल्या हाताने आपल्या तोंडात घालत नाही…. तोपर्यंत करोना स्वतःहून माणसाच्या शरीरात घुसत नाही. शरीरात घुसल्यानंतर सुद्धा करोना स्वतःहून माणसाच्या शरीराला काही इजा-हानी पोहोचत नाही. आपले शरीरच त्याला नाकातोंडातून घशात आणि कशातून फुफ्फुसात घेऊन जाते….  पुढे जे काही होते ते सर्व माणसाचं शरीरच करत असते. करोना विषाणूचा गुणाकार सुद्धा करोना स्वतः करत नाही. निसर्गाने त्याला प्रजनन क्षमता दिलेलीच नाही. तो गुणाकार सुद्धा माणसाच्या शरीरात माणसाचेच शरीरच करत असते.

अशा तऱ्हेने आपलं शरीर आपलाच घात करत असते आणि त्यासोबतच इतर माणसांचा व मनुष्यजातीचाही घात करत असते.  माणसाने स्वतः काय करावे आणि काय करू नये याची शिस्त जर माणसालाच नसेल तर माणसाच्या दुर्गुणांचा दोष करोनाच्या माथी मारण्यात काहीही अर्थ नाही. जगाच्या कोणत्याही कोर्टात हा न्याय नेल्यास करोना अपराधी ठरू शकत नाही. हा दोष सर्वस्वी माणसांचा असल्याने दोषी ठरेल शेवटी माणूसच. करोना हवेतून पसरत नाही. करोनाची वाहतूक अन्य रोगांच्या जिवाणू सारखी मच्छर करू शकत नाही, सूक्ष्म किडेमकोडे करू शकत नाही. पशुपक्षी करू शकत नाही.

करोनाची वाहतूक व प्रसार केवळ आणि केवळ मनुष्यच करू शकतो. त्यामुळे आता माणसाच्या जीविताला भीती करोनापासून नव्हे तर माणसापासूनच निर्माण झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक पिढ्या सुखासीन आणि संरक्षित जीवन उपभोगायला मिळाल्याने माणूस स्वतःचे रक्षण स्वतः कसे करायचे…. हेच जर विसरला असेल तर हा दोष कोणत्या देवाचा, धर्माचा अथवा निसर्गाचा नसून दोष केवळ माणसाचा आहे. ज्याला जगायचे असेल त्याने स्वतःचे रक्षण कसे करायचे हे ठरवायचे आहे. मनुष्याचे रक्षण करायला नोकर-चाकर-अंगरक्षक-शिपाई-पोलीस-सैनिक या संकल्पना याक्षणी कालबाह्य झालेल्या आहेत.

– गंगाधर मुटे आर्वीकर
दि. ०५/०४/२०२०
(क्रमशः)

Like
Like Love Haha Wow Sad Angry
61
,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu