विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणा-या आणि आजवर हुलकावणी देणा-या हिग्ज-बोसॉन किंवा गॉड पार्टिकल नावाने ओळखल्या जाणा-या मूलकणाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाल्याचा दावा बुधवारी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च (सर्न) या संस्थेने केला. या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच भारतीय शास्त्रज्ञ या प्रकल्पाशी संलग्न होते. टीआयएफआरप्रमाणेच बीएआरसी तसेच इंदूरच्या राजा रामण्णा सेन्टर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी या अणुऊर्जा आयोगाच्या अखत्यारीतील केंद्रांनी सुरुवातीपासूनच महत्त्वाची सामग्री सर्न प्रयोगशाळेसाठी पुरविली. १९९८ मध्येच राजा रामण्णा केंद्रातून ५० हजार लिटर्सचे लिक्विड नायट्रोजन टँक येथे बांधले गेले. या प्रकल्पात १६०० सुपरकंडक्टिंग मॅग्नेट अर्थात चुंबक वापरण्यात येणार होते. प्रत्येकी ३२ टन वजन व १५ मीटर लांबीचे हे चुंबक हलविणेही कठीण असते.
माणसाच्या केसाइतका फरकही त्यात चालत नाही. प्रीसिजन मॅग्नेट पोझिशनिंग सिस्टिमचे जॅक हे काम अचूकपणे करतात. अशा सामग्रीची निर्मिती राजा रामण्णा केंद्रासाठी महत्त्वाची ठरली. फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर जमिनीखाली २७ किलोमीटर क्षेत्रात वर्तुळाकार पसरलेल्या लार्ज हेड्रॉन कोलायडर नावाच्या उपकरणात गतवर्षी शास्त्रज्ञांनी प्रोटॉन या अणूतील कणांच्या शलाकांची धडक घडवून आणली. त्यातून विश्वाच्या निर्मितीवेळी होती तशी परिस्थिती तयार करण्याचा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. आजपासून १४ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटातून (बिग बँग) विश्वाची निर्मिती झाली, असे मानण्यात येते. ह्या संशोधनामुळे भारतीय संशोधन विश्वाला एक नवीन चालना मिळेल असे स्पस्ट होते. हा उपक्रम अविस्मरणीय आहे. यात काही नवीन शिकण्यासारखा आहे. ह्या संशोधनात भारतीय वैध्यानिकांचा अमोल्य वाटा आहे.
Source : Marathi Unlimited.
1 Comment. Leave new
india will get a huge success with such inventions…