सचिनचा भक्त असलेला कोलकात्याचा कृष्णेंदु सिन्हा आगळ्या पद्धतीने आपल्या देवाची पूजा करतो आहे. त्याने गेल्या २२ वर्षांपासून संग्रह केला आहे तो सचिनची छायाचित्रे आणि लेखांचा. आज त्याच्याकडे १0 हजारांहून अधिक दुर्मीळ छायाचित्रे आहेत. याशिवाय गेल्या १५ वर्षांत सचिनच्या नावाचे जेवढेही लेख वृत्तपत्रांत किंवा विविध मॅगझिन्समध्ये छापून आले आहेत ते कृष्णेंदुजवळ उपलब्ध आहेत. कोलकात्यात एका मॅचच्या कव्हरेजसाठी गेलो असताना या अवलीयाची भेट झाली.कृष्णेंदुने १९९0मध्ये पहिल्यांदा सचिनला खेळताना पाहिले, तेव्हा तो आठ वर्षांचा होता. तेव्हापासून सचिन त्याला भावला. सचिनचा फोटो कुठेही सापडला, तर तो त्याच्या नजरेतून सुटू शकत नाही. तो त्याचा संग्रह करू लागला. ही माहिती गोळा करण्यासाठी त्याला त्याच्या आई-वडिलांनीही मदत केली. एवढेच नव्हे, तर परिसरातील वृत्तपत्रविक्रेतेही कृष्णेंदुच्या ‘सचिनप्रेमा’ला जाणतात. त्यामुळे सचिनचे छायाचित्र वृत्तपत्रात छापून आले, की ते त्याला कळवतात. कृष्णेंदुला सचिनच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. त्याची आकडेवारी, त्याचे विक्रम तर त्याच्या तोंडावर आहेत.
सचिनचा जन्मदिवस तर तो एखाद्या मोठय़ा सणासारखाच साजरा करतो. या दिवशी तो सजून-धजून केवळ केकच कापत नाही, तर परिसरातील मित्र-परिवाराला मिठाई वाटतो.
Leave a Reply