जिवलगा राहिले रे दूर घर माझे

Jiwlaga-Rahilere-Dur-Ghar-Maze marathi kavita

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे ! ॥धृ.॥

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥१॥

गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे ॥२॥

निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी ?
तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे ॥३॥
गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले

Like
Like Love Haha Wow Sad Angry